। अहमदनगर । दि.29 ऑगस्ट । येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील (एमआयडीसी) उद्योजक आणि उद्योगांना जाणवणार्या अडचणी सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू. त्याचबरोबर विस्तारित एमआयडीसी, सध्याच्या एमआयडीसीतील भूखंड वाटप, स्वतंत्र पाणीपुरवठा व्यवस्था याबाबत निश्चितपणे सकारात्मक पावले टाकण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधि व न्याय राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी केले. औद्योगिक क्षेत्रात हॉस्पिटल तसेच घनकचरा व्यवस्थापनासाठी असणारे औद्योगिक यंत्रणेला सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
एमआयडीसीच्या विविध प्रश्नांसंदर्भात आज मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अग्रिकल्चर च्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार संग्राम जगताप, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स चे व्हाईस चेअरमन श्री प्रकाश गांधी, एच आर फोरम चे चेअरमन श्री राजेश पेवाल, दिलीप अकोलकर आदींची उपस्थिती होती.
यावेळी राज्यमंत्री कु.तटकरे यांनी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स- अहमदनगर येथील सभागृहात उद्योजकांची भेट घेऊन त्यांच्या सुविधा व अडचणी या विषयांवर चर्चा केली. वाढत्या वीज दरामुळे उद्योजकांना निर्माण होणारी अडचण, औद्योगिक क्षेत्रातील कामगारासाठी उपयुक्त अशा ई एस आय सी हॉस्पिटलची आवश्यकता, निंबळक चौक ते सन फार्मा कंपनी समोरील रस्त्याचे विस्तारीकरण वेगाने व्हावे तसेच वॉटर पाईपलाईनचे कामही वेगाने व्हावे व औद्योगिक क्षेत्रात निर्माण होणारा घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी त्या क्षेत्रात काम करणार्या औद्योगिक आस्थापनांना सहकार्य करण्यात यावे या उद्योजकांच्या अडचणींबाबत त्यांनी सकारात्मक चर्चा केली.
आमदार जगताप यांनी उद्योजकांना आवश्यक ते सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. राज्य स्तरावर प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी उद्योजक प्रतिनिधी आणि आपण पाठपुरावा करू, असे त्या म्हणाल्या.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स मधील एच आर फोरम चे चेअरमन श्री. पेवाल यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष गांधी यांनी मागण्यांबाबत निवेदन सादर केले. आमी संघटनेच्यावतीने उपाध्यक्ष संजय बंदिस्त यांनी 168 प्लॉट विषयी उद्योजकांच्या बाजूने निर्णय घ्यावा अशी विनंती केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठा चेंबर चे अधिकारी प्रदीप बागुल यांनी केले .
Tags:
Ahmednagar
