शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला अटक

। मुंबई । दि.20 जुलै । अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. राज कुंद्राला क्राईम ब्रान्चने चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आले. पॉर्न रॅकेटप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून ऍप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात पोलिसांकडून चित्रपट बनवणाऱ्या अनेकांची चौकशी करण्यात आली होती. तसेच राज कुंद्रालाही १९ जुलै रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. 

त्यानुसार मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलकडून सुमारे ७ ते ८ तास त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी राज कुंद्राला पोलिसांनी अटक केली. आता आज त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

पॉर्न ऍप्स प्रकरणात राज कुंद्रा हा मुख्य सूत्रधार असल्याचे दिसत आहे. यासंदर्भात त्याच्याविरोधात पोलिसांकडे पुरेसे पुरावे असल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे. याबाबत फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने कुंद्राला सोमवारी चौकशीसाठी बोलावले होते.

दरम्यान, यापूर्वी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरुद्ध एका उद्योगपतीने मार्च 2020 मध्ये तक्रार केली होती. मुंबईतील एक नॉन-रेसिडेन्शिअल इंडियन उद्योगपती सचिन जे. जोशी यांनी पोलिसात तक्रार केली होती. 

हे प्रकरण सोन्याचा व्यापार करणारी कंपनी ‘सतयुग गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड’शी (एसजीपीएल) संबंधित होते. कुंद्रा हा यापूर्वी या कंपनीचा माजी संचालक होता. मात्र मुंबईतील खार पोलीस स्टेशनमध्ये जोशी यांनी शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, गणपती चौधरी आणि मोहम्मद सैफीसह एसजीपीएलच्या इतर अधिकाऱ्यांवर फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती.

Post a Comment

Previous Post Next Post