'जय भवानी.जय शिवाजी'च्या गजरात किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा

।  रायगड । दि.07 जून ।  हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष आणि सर्वांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३४८ वा शिवराज्याभिषेक सोहळा रविवारी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर साधेपणाने आणि मोजक्याच शिवप्रेमींच्या उपस्थितीत अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा महोत्सव समितीच्या वतीने साजरा करण्यात आला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असतानाही लोकोत्सव बनलेल्या या पारंपरिक सोहळ्यात खंड पडला नाही.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा महोत्सव समितीच्या वतीने करवीर संस्थानचे युवराज खासदार छत्रपती संभाजीराजे छत्रपती व युवराज्ञी संयोगिता राजे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी किल्ले रायगडावर दि. ५ व ६ जून रोजी हा सोहळा साजरा करण्यात येतो. गतवर्षाप्रमाणे यंदाही कोरोनाच्या संकटामुळे मोजक्याच शिवप्रेमींच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्याचा निर्णय घेतल्याने समितीचे मोजकेच पदाधिकारी व कार्यकर्ते किल्ले रायगडवर आले होते.


 


 

Post a Comment

Previous Post Next Post