। अहमदनगर । दि.17 एप्रिल । शहर व उपनगरातून मोटरसायकल चोरणार्या दोघांना तोफखाना पोलिसांनी पकडले त्यांच्याकडे चोरीच्या तीन मोटर सायकल एक मोबाईल असा 58 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पाईपलाईन रोड परिसरातील तपोवन रोडवर केली.
काही दिवसापूर्वी शहरासह मोटरसायकल चोरीचे सत्र सुरू झाले. बुधवारी दिनांक 14 रोजी तोफखाना पोलीस ठाण्याचे हद्दीतील तेलीखुंट येथील शिंपी गल्लीतील बाळू रामदास शिंदे यांची मोटारसायकल चोरी गेली.
याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास हेड कॉन्स्टेबल जपे डी बी हे करीत आहेत. या गुन्ह्याचा तपास तसेच कोरोणा साथरोगाच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना तपोवन रोड वरून औरंगाबाद रोड कडे दोन इसम नंबर नसलेल्या मोटरसायकलवरून जाताना दिसले.
पोलिसांना त्याचा संशय आला. पोलिसांनी त्यांना अडवून चौकशी केली त्यांचे नाव गणेश देविदास सणाला (वय 23 राहणार श्रमिक नगर बालाजी मंदिर जवळ ) प्रवीण भाऊ साहेब बोंडगे ( वय 27 राहणार एमायडिसी अनगर ) असे सांगितले.
त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांची मोटरसायकल रंगार गल्ली इथून चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी तोफखाना पोलीस ठाणे हदीतून स्प्लेंडर मोटर सायकल व स्कूटर, मोबाईल चोरल्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्यांच्याकडून तीस हजार रुपये हिरो पॅशन मोटरसायकल,( कोतवाली हद्दीतून चोरलेली ) दहा हजार रुपये किमतीचे हिरो होंडा मोटर सायकल ( तोफखाना हद्दीतून चोरलेली ) वीस हजार रुपये किमतीची प्लेझर स्कूटर व अठराशे रुपये किमतीचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला.
ही कारवाई तोफखाना पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस हवालदार पोलीस नाईक वसीम पठान पोलीस नाईक अविनाश वाकचौरे पोलीस नाईक प्रमोद इनामदार पोलीस हवालदार सचिन जगताप यांनी केले.
