। वाई । दि.17 एप्रिल । ओझर्डे, ता. वाई येथील सोमनाथ अरविंद तांगडे, वय 38 हा तरुण मिलिट्रीमधील सिग्नल डिपार्टमेंटमध्ये हवालदार या पदावर सिक्कीम येथे कॉलिंगपाँग येथील 10 किलो मीटरवर बर्फाच्या टेकडीवर इतर दोघांबरोबर नेमणुकीस होता. पण दि. 8 रोजी बर्फाच्या डोंगराळ भागाला वादळी वारा व पावसाने रात्री 3 च्या सुमारास झोडपून काढले. त्यात त्यांचे तंबू उडून गेले. त्यामुळे रात्रभर हे तिघेही भीषण थंडीत कुडकुडत बसले.
त्यावेळी ओझर्डे येथील रहिवासी असलेले जवान सोमनाथ अरविंद तांगडे हे चक्कर येऊन बर्फावर आदळल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी कॉलिंगपाँग येथील बॅरेकपूर येथे मिलिट्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. पण तेव्हापासून ते कोमात गेले व आज, दि. 16 रोजी त्यांचा उपचारा दरम्यानच सकाळी 7 च्या सुमारास मृत्यू झाला.
त्यांचे शव सिक्कीमवरून विमानाने पुण्यापर्यंत आणण्यासाठी ओझर्डे ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी श्रीमती रेश्मा, मुलगी सिद्धी (वय 12) व परी (वय 8) असे आहेत.शहीद सोमनाथचे पार्थिव लवकर मिळण्यासाठी खा. श्रीनिवास पाटील यांच्यामार्फत ओझर्डे ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या आकस्मित जाण्याने ओझर्डे गावासह वाई तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
