। मुंबई । दि.23 एप्रिल । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत असणारे निर्बंध आणखी कठोर केले आहेत. तसेच प्रवासावरील निर्बंधही अधिक कडक करण्यात आले असून या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा ई-पासची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना आता ई-पाससाठी रितसर अर्ज करावा लागणार आहे.
गुरुवारी रात्रीपासून राज्यात प्रवास, कार्यालयीन उपस्थिती, विवाहसोहळ्यांवर अनेक निर्बंध आले. १ मेपर्यंत हे नियम लागू असणार आहेत. त्यामुळे यादरम्यानच्या काळात काही महत्त्वाच्या कारणासाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यास नागरिकांनी ई-पासचा वापर करावा, असे आवाहन राज्यातील पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे. त्यानुसार अत्यावश्यक कारणांसाठी आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी नागरिकांना ई-पासची आवश्यकता लागणार आहे.
महत्त्वाचे मुद्दे:
– अतिशय जवळच्या व्यक्तीचा विवाहसोहळा, एखाद्या व्यक्तीचा अंत्यविधी आणि अत्यावश्यक आरोग्य आणिबाणी या कारणांसाठी ई-पास मिळवता येऊ शकतो.
– अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांसाठी आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही.
– कोणतीही व्यक्ती किंवा त्यांचा समूह या पाससाठी अर्ज करू शकतो.
ई-पास मिळवण्यासाठी काय करावं?
– ई-पास मिळवण्यासाठी सर्वप्रथम, https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
– नंतर ‘apply for pass here’ या पर्यायावर क्लिक करावे.
– पुढे तुम्हाला ज्या जिल्ह्यात प्रवास करायचा आहे, तो जिल्हा निवडावा.
– आवश्यक कागदपत्र जोडावीत.
– प्रवास करण्यासाठीचे अत्यावश्यक कारणही नमूद करावे.
– कागदपत्र अपलोड करताना सर्व माहिती तपशील एकाच डॉक्युमेंटमध्ये घेऊन तो अपलोड करावा.
– अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक टोकन आयडी देण्यात येईल. तो सेव्ह करून अर्ज नेमका कोणत्या प्रक्रियेत आहे हे तुम्ही जाणू शकता. थोडक्यात या माध्यमातून तुम्हाला अर्जाचे स्टेटस तपासता येईल.
– पडताळणी आणि आवश्यक विभागांची परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही तोच टोकन आयडी वापरून ई-पास डाऊनलोड करु शकता.
– या ई-पासमध्ये तुमची माहिती, वाहनाचा क्रमांक, पासचा वैधता कालावधी आणि क्यूआर कोड असेल.
– प्रवास करतेवेळी पासची मूळ प्रत आणि त्याची सॉफ्ट कॉपीही सोबत बाळगा. जेणेकरून पोलिसांनी विचारले असता त्यांना हा पास दाखवता येऊ शकतो.
– ज्यांना ऑनलाईन पद्धतीने ई-पास काढता येत नसेल, त्यांनी सदर प्रक्रियेसाठी नजीकच्या पोलीस स्थानकाला भेट द्यावी. जिथे त्यांची मदत केली जाईल.
