। मुंबई । दि.20 एप्रिल । राज्यासह देशात कोरोनाचे थैमान सुरु असून कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता इयत्ता १० वीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
सध्या कोरोनाची वाढती आकडेवारी चिंताजनक असून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे काय होणार ? असा सवाल विद्यार्थी आणि पालकांना पडला होता. दहावी बोर्डाच्या परीक्षांसंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा झाली. यावर्षी परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांना प्रमोट करण्यात यावे यासंदर्भात मंत्रिमंडळात एकमताने निर्णय झाला असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
या संदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं, दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून विद्यार्थ्यांचं इंटरनल असेसमेंट होणार असून त्या संदर्भात शिक्षण क्षेत्रातील तज्ञांसोबत चर्चा करुन सविस्तर माहिती जाहीर करण्यात येईल. तर बारावीची परीक्षा मे अखेरीस होण्याची शक्यता आहे.
वर्षा गायकवाड यांचं ट्विट : महाराष्ट्रातील कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती वाईट होतं आहे. हे पाहता महाराष्ट्र शासनानं दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी, शिक्षक यांचं आरोग्य आमच्यासाठी पहिलं प्राधान्य असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.
