। नवीदिल्ली । दि.26 एप्रिल । देशातील कोरोना संकटाचा कहर पाहता दिल्ली सरकारने महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. केजरीवाल सरकारने १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
लसीकरण वेगाने व्हावे यासाठी दिल्ली सरकारने १.३४ कोटी लसींची ऑर्डर दिली आहे. १ मेपासून दिल्लीत लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जाईल असेही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले. मोफत लसीकरणाचा सामान्य जनतेला फायदा होईल, असेही त्यांनी पुढे सांगितले.
रम्यान, देशात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकने लसींचे दर निश्चित केले आहेत. यात कोविशील्ड राज्य सरकारला ४०० रुपये आणि खासगी रुग्णालयांना ६०० रुपयात मिळणार आहे, तर कोव्हॅक्सिन राज्य सरकारला ६०० रुपये आणि खासगी रुग्णालयांना १२०० रुपयात मिळणार आहे.
दुसरीकडे ही लस केंद्र सरकारला १५० रुपयात दिली जाणार आहे. यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही लसींच्या दरावरून टीका केली आहे. केंद्र, राज्य आणि खासगी रुग्णालयांना एकाच किंमतीत लस मिळाली पाहिजे अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
लस निर्मिती करणाऱ्या कंपन्याचा दावा आहे की, १५० रुपये फायदा होतो मग वेगवेगळे दर का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नफा कमवण्यासाठी पूर्ण आयुष्य पडले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच केंद्र सरकारने यात दखल घेत दर निश्चित केले पाहिजेत अशी सूचनाही केली.