कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी कराः ना. बाळासाहेब थोरात

जिल्हा रूग्णालयासह कर्जत, पाथर्डी, संगमनेर,

श्रीरामपूर येथे ऑक्सिजन प्लांट उभारणार

जिल्ह्याला 100 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन पुरवणार

शहरात ससूनसारखे मोठे रूग्णालय 

उभारण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे सादर करा


। अहमदनगर । दि.24 एप्रिल । अहमदनगर जिल्ह्यात कडक निर्बंध घालून दिलेले असले तरी, काही ठिकाणी नियमांचे पालन होताना दिसत नाही. अजूनही लोक रस्त्यावर दिसत आहेत, कायदा मोडणार्‍यांची गय करू नका अशा सूचना राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात  यांनी  अधिकार्‍यांना  दिल्या. जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी थोरात यांनी आज प्रशासकीय आणि आरोग्य अधिकार्‍यांची बैठक घेतली व अधिकार्‍यांना सूचना केल्या.

यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, बाधित रुग्णांसाठी होम क्वारंटाइन / होम आयसोलेशन पद्धतीचा पुर्नविचार करणायाची वेळ आली आहे. सर्व रुग्णांना संस्थात्मक क्वारंटाइन केले पाहिजे, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून लक्षणे असणार्‍यांचे विलगीकरण करा, संगमनेरमध्ये याचा चांगला परिणाम झाला, बधितांची संख्या घटते आहे.

बाधित रुग्णांना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केल्यास केवळ औषधोपचारावर रुग्ण बरा होऊ शकतो, रूग्णांना ऑक्सिजन, इंजेक्शनची गरज पडत नाही.

जिल्हा नियोजन मंडळातून नगरचे जिल्हा शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय कर्जत, पाथर्डी, संगमनेर व श्रीरामपूर येथे दररोज 250 जम्बो सिलिंडर क्षमतेचे ऑक्सिजन उत्पादन केंद्र उभारण्यात येत आहे, त्यामुळे जिल्ह्याला ऑक्सिजनचा अधिक पुरवठा होईल.


जिल्हा नियोजन मंडळ, आमदार निधीतून 100 पोर्टेबल ऑक्सिजन काँसेंट्रेटर मशीन जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांना पुरवण्याच्या सूचना यावेळी दिल्या.

अहमदनगर महापालिका हद्दीत रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे. त्यादृष्टीने निर्बंध अधिक कडक करणे अत्यावश्यक आहे. कोविड केअर सेंटरमधील सुविधा वाढविण्यावर भर द्या. उपाययोजनांचा नियमित आढावा घ्यावा. जेथे मदत लागेल ते सांगा आम्ही मदत करू.

या संकटातून बोध घेऊन पुण्यातील ससून किंवा औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाच्या धर्तीवर शहरात मोठे आरोग्य केंद्र उभारण्याच्या संदर्भाने अभ्यास करून जिल्हाधिकारी यांनी शासनास प्रस्ताव सादर करावा असे निर्देश थोरात यांनी दिले.

Post a Comment

Previous Post Next Post