। सातारा । दि.25 मार्च । महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणार्या महाबळेश्वरला काल संध्याकाळी गारांच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले.
महाराष्ट्रभर अवकाळीने हजेरी लावल्यानंतर काल महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये अचानक ढगांच्या गडगडाटासह गारांचा मुसळधार पाऊस झाल्याने नागरीकांची चांगलीच धावपळ झाली.
गारा आणि पावसामुळे या परिसरातलं वातावरण पूर्णपणे बदलून गेले आहे. पाऊस पडून गेल्यानंतर रस्त्यांवर बर्फाची चादर पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले.
त्यामुळे याठिकाणी वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला असून याचा स्थानिकांसह पर्यटक मनमुराद आनंद घेत आहेत. दरम्यान, गारांचा खच पाहून आपण महाबळेश्वरमध्ये नव्हे तर काश्मीरमध्ये असल्याचा भास होत होता, अशी भावना पर्यटकांनी व्यक्त केली आहे.
महाबळेश्वर परिसरात दोन तास चांगला पाऊस झाला. काही ठिकाणी सखळ भागांमध्ये पाणी साचलेले होते. अचानक आलेल्या या पावसामुळे वेणा नदीच्या पातळीतही वाढ झालेली पाहायला मिळाली. परंतु अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांसह पर्यटकांची तारांबळ पाहायला मिळाली.
तसेच त्यांना एक वेगळाच अनुभव घेता आला. रस्त्यावर पडलेल्या गारा दूर सारत पर्यटक गाडीने पुढे जाताना दिसत होते. यावेळी बच्चे कंपनीने गारा एकमेकांवर मारत आनंद लुटला. तसेच अनेकांनी स्केटिंगचाही आनंद घेतला.
