। पंढरपूर । दि.25 मार्च । पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना रंगणार असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपकडून माजी मंत्री राम शिंदे यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे पार्थ पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
भाजपच्या गटामध्ये सुरवातीला प्रशांत परिचारक यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, राष्ट्रवादी विरुध्द भाजप अशी लढत असल्याने प्रा.शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चाही आता जोर धरु लागली आहे. प्रा.शिंदे आणि पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा असली तरी अद्यापही भाजप आणि राष्ट्रवादीकडून अधिकृत कोणाचेही नाव घोषीत करण्यात आलेले नाही.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाचं प्राबल्य आहे. त्यामुळे राम शिंदे यांना उमेदवारी देत भाजप जातीचं समीकरण जुळवण्याच्या आणि मतदारसंघात विजय मिळवण्याच्या विचारात असल्याचं बोललं जात आहे. राम शिंदे यांच्या नावाला जिल्ह्यातील भाजपचे नेते माजी मंत्री सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांची अनुकूलता असल्याचं बोललं जात आहे.
पंढरपुरात तिरंगी लढत होणार?
भाजपकडून राम शिंदे यांना उमेदवारी मिळाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून भालके कुटुंबाला उमेदवारी टाळत पार्थ पवार यांना उमेदवारी दिली गेली, तर भगिरथ भालके हे अपक्ष निवडणूक लढवू शकतात. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेठा मतदारसंघाची पोटनिवडणूक तिरंगी होण्याची शक्यताही जाणकार व्यक्त करत आहेत.
पोटनिवडणुकीचा कार्यक्रम -
* अर्ज भरण्यास सुरुवात - 23 मार्च 2021
* अर्ज भरण्याची अंतिम तारीख - 30 मार्च 2021
* अर्जांची छाननी - 31 मार्च 2021
* अर्ज मागे घेण्याची तारीख - 3 एप्रिल 2021
* मतदान - 17 एप्रिल 2021
* निवडणूक निकाल - 2 मे 2021.
पवार विरुध्द शिंदे सामना दुसर्यांदा?
नगर जिल्हयातील कर्जत जामखेड मतदार संघामधून प्रा.राम शिंदे यांनी आपले नशिब आजमावले होते. मात्र, रोहित पवार यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. यानंतर आता पुन्हा शिंदे यांचे नाव पंढरपुर मतदार संघातील पोटनिवडणुकीत चर्चेत आल्याने पवार विरुध्द शिंदे हा दुसर्यांदा सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहे.
