राष्ट्रध्वजाच्या सन्मानार्थ धावणार्‍या सौरभ जाधवचे भविष्य उज्ज्वल : क्रीडा अधिकारी शेखर पाटील

क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांच्या हस्ते सत्कार


। अहमदनगर  । दि.26 मार्च । नगर तालुक्यातील अकोळनेरचा उदयोन्मुख धावपटू सौरभ जाधव याने पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हातात राष्ट्रध्वज घेऊन पावणे आठ तासात 72 किमी अंतर पार केले तर त्याच मार्गावर दि.21 मार्च रोजी 90 किमी अंतर राष्ट्रध्वजासह सव्वा चार तासात सायकलवर पार केले.

इंटरनॅशनल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याच्या या विक्रमाची नोंद झाली. या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी त्याचा सत्कार केला.

याप्रसंगी शेखर पाटील म्हणाले, चमत्काराशिवाय नमस्कार होत नाही. त्यासाठी खेळाडूंनी चमत्कारपूर्ण कामगिरी केली पाहिजे. सरावातील सातत्य, योग्य आहार, पुरेशी झोप महत्वाची आहे. यशस्वी खेळाडूंच्या कामगिरीचा सातत्याने ध्यास घेतला तर यश हुलकावणी देत नाही.

सौरभवने राष्ट्रध्वजाच्या सन्मानार्थ धावून राष्ट्रप्रती आपली भक्ती दाखवून दिली आहे. त्यामुळे भविष्यात तो अनेक स्पर्धां आपल्या राष्ट्राचे प्रतिनिधीत्व करेल. नगरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकवेल यात शंका नाही. त्याचे भविष्य उज्वल आहे, असे सांगितले.

यावेळी  नगर जिल्हा शहर युवक  काँग्रेचे अध्यक्ष किरण काळे म्हणाले, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवणार्‍या या धावपटूला सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे सांगून शुभेच्छा दिल्या. सौरभ जाधवच्या या यशाबद्दल जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी त्याचे अभिनंदन केले.

याप्रसंगी तालुका क्रीडा अधिकारी विशाल गर्जे, स्काऊट गाईड निदेशक दिलीप भोर, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक पोपट धामणे, शिक्षक दत्तात्रय धामणे, साहेबराव जाधव, विजय जाधव, रमेश  पोवार आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post