पै.कोतकर यांच्या रूपाने नगर शहराला महाराष्ट्र केसरीचा किताब मिळावा : किरण काळे

महाराष्ट्र केसरी कुस्तीसाठी पै. सुदर्शन कोतकर 

यांची निवड झाल्याबद्दल काँग्रेसच्यावतीने सत्कार


। अहमदनगर । दि.03 मार्च । नुकत्याच संगमनेर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्तीसाठीच्या निवड चाचणी मध्ये गादी विभागातून नगर शहरातील पै. सुदर्शन कोतकर यांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याबद्दल पै. कोतकर यांचा काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते काँग्रेस कार्यालयात सत्कार करण्यात आला.


पै. कोतकर यांच्या रूपाने नगर शहराला महाराष्ट्र केसरीचा किताब मिळावा असा आशावाद यावेळी काळे यांनी व्यक्त करत त्यांना पुढील स्पर्धेसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक पै.संग्राम शेळके, पै.सागर गायकवाड, राष्ट्रीय खेळाडू व काँग्रेस क्रीडा विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, नगर युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड.अक्षय कुलट आदी उपस्थित होते.


संगमनेर येथे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसा निमित्त महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ व संगमनेर तालुका कुस्ती तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने निवड चाचणीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या निवड चाचणीमध्ये झालेल्या अटीतटीच्या निवड सामन्यामध्ये पै  कोतकर यांनी बाजी मारली आहे. पै. सुदर्शन हे शिवसेना युवा सेनेचे शहर प्रमुख हर्षवर्धन कोतकर यांचे कनिष्ठ बंधू आहेत.


यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले की, नगर शहराला कुस्तीची मोठी परंपरा आहे. पै. छबुराव लांडगे यांच्यासारखे नावाजलेले मल्ल याच नगरच्या मातीमध्ये घडले. पै.कोतकर हे सुद्धा महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये उत्तम खेळाचे प्रदर्शन करत नगर शहराचा नाव लौकिक सबंध राज्यात आणि देशात मोठा करतील याची मला खात्री आहे.


आपल्या भावना व्यक्त करताना पै. सुदर्शन कोतकर म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या सत्कारा मुळे माझे मनोबल निश्‍चितपणे वाढले आहे. नगरकरांच्या शुभेच्छा आणि दैनंदिन सराव हीच चांगल्या खेळाचे प्रदर्शन करण्यासाठीची माझी ताकद असणार आहे.


 

Post a Comment

Previous Post Next Post