लाच मागणारा हवालदार लाचलुचपतच्या ताब्यात

। अहमदनगर । दि.05 फेब्रुवारी । पत्नीने केलेल्या तक्रारीवरून पतीवर कारवाई टाळण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या पारनेर पोलिस ठाण्यातील हवालदार शंकर गुलाब रोकडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.


देवीभोयरे फाटा येथील तक्रारदाराला हवालदार रोकडे याने फोन करुन सांगितले की, तुझ्या पत्नीने तुझ्याविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे तुझ्यावर कारवाई करावी लागेल. कारवाई टाळायची असेल तर पाच हजार रुपये आणून दे. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.

 

संबधित अधिकाऱ्यांनी तक्रारदाराकडे व्हॉईस रेकॉर्डर सुपूर्द केला व रोकडे बरोबर होणाऱ्या संभाषणाचे रेकॉर्डींग करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तक्रारदाराने हवालदार रोकडेची पारनेर पोलिस ठाण्यात भेट घेतली. त्यावेळीही रोकडेने पाच हजारांची मागणी केली. पैसे घेण्यासाठी मी देवीभोयरे फाटा येथे घरी येतो असे रोकडेने तक्रारदाराला सांगितले. 

 

त्यानुसार लाचलुचपतच्या पथकाने देवीभोयरे फाटा येथे सापळा रचला. मात्र रोकडेला संशय आल्याने तो देवीभोयरे फाट्याकडे फिरकला नाही. मात्र रेकॉर्ड झालेल्या संभाषणातून रोकडेने लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याने लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post