। अहमदनगर । दि.15 फेब्रुवारी । जिल्हयातील शेवगांव तालुक्यातील शिंगोरी येथे चोरट्यांनी रविवारी (दि.14) रोजी पहाटे साधारण अडीचच्या दरम्यान चार ठिकाणी घरफाडी करुन चोरट्यानी रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने व शेळ्या लंपास केल्या आहेत. दरम्यान, येथील एका वृध्द पती- पत्नीवर चोरट्यांनी चाकुहल्ला करुन या दाम्पत्याला लाथा-बुक्यांनी मारहाण केली आहे. या मारहाणीमध्ये वृध्द दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेली माहिती अशी की, शिंगोरी येथील आबासाहेब यशवंत खंडागळे (वय 60)व सुमन आबासाहेब खंडागळे (वय 55) हे वृध्द दाम्पत्य रात्रीच्या सुमारास घरात झोपले असता, रविवारी पाहटेच्या दरम्यान चोरट्यांनी ‘आबा दार उघडा.. आम्हाला तहान लागली’ अशी नावाने हाक मारली. यावेळी सुमन खंडागळे यांना जाग आली त्यांनी घरातुन त्यांना सांगितले की, बाहेरच पाणी आहे ते प्या, यानंतर चोरट्यांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला.
यानंतर आबासाहेब यांना चोरटेच असल्याचा अंदाज आल्याने त्यांनी चोरट्यांना प्रतिकार करण्यासाठी वस्तु शोधू लागले. त्याच दरम्यान, पत्नीने दरवाजा उघडला. यानंतर चोरट्यांनी घरात प्रवेश करुन आबासाहेब खंडागळे यांच्यावर शस्त्राने हल्ला केला.चोरट्यांच्या झटापटीत आबासाहेब गंभीर जखमी झाले आहेत. चोरट्यांशी संघर्ष करीत त्यांनी सुटका करुन घेतली तसेच येथून पळाल्याने ते बचावले आहे.
आबासाहेब यांच्या पत्नीला चोरट्यांनी लाथा बुक्यानी मारहाण करुन त्यांच्या गळ्यातील 1 तोळे सोन्याचे मंगळसुत्र चोरुन नेले तर घरामधील रोख रक्कम 7 हजार 500 रुपये चोरुन चोरट्यांनी पळ काढला. आरडा ओरडा झाल्याने चोरट्यांनी तातडीने येथून पळ काढला.
