झाडे जप्त; शेतकर्याला अटक
। अहमदनगर । दि.26 फेब्रुवारी । कोरोनाच्या काळात पोलिसांचे दुर्लक्ष होईल, असा अंदाज बांधून जामखेड तालुक्यातील एकाने आपल्या शेतात अफु पिकवल्याची बाब समोर आली आहे. मात्र, पोलिसांना या गोष्टीचा सुगावा लागल्याने पोलिस आणि महसूल अधिकार्यांनी छापा मारुन एक लाख 70 हजार रुपये अफूची झाडे जप्त केली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की जामखेड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना माहिती मिळाली की जामखेड तालुक्यातील जातेगाव या ठिकाणी एका व्यक्तीने त्याच्या शेतात अफूची झाडे लावली आहेत.
माहितीची खातरजमा करुन त्यांनी छापा घालण्याचे नियोजन केले. गुरुवारी सायंकाळी पोलिस निरिक्षक गायकवाड यांनी पथकासह छापा मारला. शेतामधून 56 किलो वजनाची झाडे जप्त करण्यात आली आहे. बोंड आल्याच्या अवस्थेत हे पीक होते. त्याची किंमत सुमारे एक लाख 70 हजार रुपये होते. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करुन ती झाडे जप्त केली.
घटनास्थळी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी देखील भेट दिली आहे. जामखेड पोलीस स्टेशन चे पो.हे.कॉ संजय लाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी वासुदेव महादेव काळे याच्या विरोधात अमली औषधे द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम सन 1985 च्या कलम 15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड हे करत आहेत.