अहमदनगर रेल्वे स्थानकावर रेल्वे रोकोचा प्रयत्न

पोलीसानी प्रवेशद्वारातच अडवले आंदोलकांना

 

। अहमदनगर ।  दि.18  फेब्रुवारी । दिल्लीच्या सीमेवर अडीच महिन्यांहून अधिक कालावधीपासून आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांची दखल न घेता त्यांचे आंदोलन हुकुमशाहीने दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा निषेध नोंदवून अ.भा.किसान संघर्ष समन्वय समिती व महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने अहमदनगर रेल्वे स्थानक येथे रेल्वे रोकोचा प्रयत्न करण्यात आला.


शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी देशभर रेल्वे रोकोची हाक देण्यात आली होती. या पार्श्‍वभूमीवर नगरमध्ये रेल्वे रोकोचा प्रयत्न करण्यात आला. मोठ्या प्रमाणात पोलीसांचा फौजफाटा रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारात बंदोबस्तासाठी असल्याने आंदोलकांना प्रवेशद्वारातच अडवून रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यापासून रोखण्यात आले.


या आंदोलनात भाकपचे राज्य सहसचिव अ‍ॅड.कॉ.सुभाष लांडे, मारुती भापकर, बन्सी सातपुते, अ‍ॅड. कॉ.सुधीर टोकेकर, आर्किटेक अर्शद शेख, संजय नांगरे, फिरोज शेख, सतीश पवार, सलिम सय्यद, भारती न्यालपेल्ली, लक्ष्मी कोटा, शारदा बोगा, सिंधूताई त्र्यंबके, कमल दोंता, सुभाष शिंदे, गंगाधर त्र्यंबके, सुरेश पानसरे, कॉ. महेबुब सय्यद, प्रा.बापू चंदनशिवे आदी विविध पक्षाचे व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.


केंद्रातील विद्यमान भाजपप्रणित मोदी सरकारने करोना लॉकडाऊन काळात शेतकरी, शेतकरी संघटना किंवा विविध राज्य सरकारे यापैकी कुणालाही विश्‍वासात न घेता घाईघाईने तीन शेतकरीविरोधी कायदे सर्व लोकशाही संकेत पायदळी तुडवून पास करून घेतले आहेत. या कायद्याच्या विरोधात देशातील शेतकरी आजमितीला 80 पेक्षा जास्त दिवसांपासून आंदोलन करीत आहेत.


त्याचाच एक भाग म्हणून दिल्लीकडे जाणार्‍या विविध सिमेवर हजारोच्या संख्येने धरणे आंदोलनात बसले असून केंद्र सरकारच्या वेळकाढू व आडमुठेपणामूळे या आंदोलनात आता पर्यंत दोनशे पेक्षा जास्त शेतकरी आंदोलक शहीद झाले आहेत. शेतकरी संघटना संयुक्त समितीने शेतकरी विरोधी कायदे रद्द करून शेतीमालाला किमान आधारभूत किंमत (एमएसपी) कायदा करावा या मागणीसाठी संघटनेच्या वतीने रेल्वे रोको आंदोलनाचा प्रयत्न करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post