। मुंबई । दि.19 फेब्रुवारी । पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ऐन महागाईत गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे भावही वाढत असल्याने सर्वसामान्यांचे बजट कोलमडले आहे.
आज सलग अकराव्या दिवशी ही वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल 25 पैशांनी महागले असून ते 97 रुपयांवर पोहोचले आहे, तर दिल्लीत पेट्रोलची किंमत 31 पैशांनी वाढली असून ती 90 रुपये 19 पैशांवर पोहोचली आहे. तसेच मुंबईत डिझेल 88 रुपये, तर दिल्लीत 86.60 रुपयांवर पोहोचले आहे.
दिल्ली आणि मुंबईत पेट्रोलच्या दरांनी कहर केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेल्याच्या किंमतीतही सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाची किंमत 65 डॉलर प्रति बॅरेल इतकी वाढली आहे.
आंतरराष्ट्रीय वायदे बाजार इंटरक टिनेन्टल एक्सचेन्जमध्ये गुरुवारी कच्च्या तेलाच्या किंमतीत 1.21 रुपयांची वाढ झाली असून ते 65.12 डॉलरवर पोहोचल्याचे दिसून आले. तर न्यूयॉर्क मर्केंटाईल एक्सचेन्ज (नायमॅक्स)वर कच्च्या तेलाच्या किंमतीत 0.96 टक्क्यांची वाढ होऊन ती 62.27 डॉलरवर पोहोचली आहे.
तसेच केंद्र सरकार सध्या पेट्रोलवर 32.90 रुपये एक्साइज कर लावत आहे. सध्यातरी या करामध्ये कोणतीही कपात करण्याचा विचार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तसे संसदेत सांगितले.
