। अहमदनगर । दि.11 फेब्रुवारी । अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या सेवा सोसायटी मतदारसंघातील 11 जागा तसेच महिला प्रतिनिधी मतदारसंघातील 2, इतर मागास वर्गातील 1 व शेतीपूरक तसेच शेतीमाल प्रक्रिया व पणन संस्था मतदारसंघातील 1, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातील 1, विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघातील 1 अशा 21 पैकी 17 जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर सेवा सोसायटी मतदार संघात नगर, पारनेर, कर्जत आणि बिगर शेती मतदार संघ अशा 4 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
या निवडणुकीमधून आ.अरुण जगताप, आ.संग्राम जगताप, माजी आ.पांडुरंग अभंग, माजी आ.वैभव पिचड, उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आ.निलेश लंके आदींसह दिग्गजांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने अनेकांना संधी मिळाली आहे.
जिल्हा बँक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर बरेच मंथन होवून 17 जागा बिनविरोध झाल्या आहेत. महिला राखीव गटातून अनुराधा नागवडे, राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची नेवासा सोसायटी मतदारसंघातुन संचालक पदी बिनविरोध निवड झाली.
बिनविरोध झालेल्यांमध्ये विवेक कोल्हे (कोपरगाव), आ. मोनिका राजळे (पाथर्डी), अण्णासाहेब म्हस्के (राहाता), चंद्रशेखर घुले (शेवगाव), राहुल जगताप (श्रीगोंदा), अमोल राळेभात (जामखेड), सीताराम गायकर (अकोले), मंत्री शंकरराव गडाख (नेवासा), अरुण तनपुरे (राहुरी), माधवराव कानवडे (संगमनेर), भानुदास मुरकुटे (श्रीरामपूर) यांचा समावेश आहे. महिला प्रतिनिधी मतदारसंघातून अनुराधा नागवडे (श्रीगोंदा) व आशा काकासाहेब तापकिर (कर्जत) या बिनविरोध झाल्या आहेत. इतर मागासवर्ग मतदारसंघातून करण जयंत ससाणे (श्रीरामपूर) हे तर शेतीपूरक तसेच शेतीमाल प्रक्रिया व पणन संस्था मतदारसंघातून आ.आशुतोष काळे हे बिनविरोध झाले आहेत. तर अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून अमित अशोक भांगरे (अकोले), विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघातील गणपतराव सांगळे (संगमनेर) हे बिनविरोध झाले आहेत.
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक 20 फेब्रुवारीला होत आहे. या निवडणुकीसाठी 21 जागा असून, त्यासाठी 195 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज छाननीत वैध ठरलेले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत गुरुवारी (दि. 11) दुपारी 3 वाजेपर्यंत होती. या वेळेत दिग्गजांनी निवडणुकीतून माघार घेतली.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी घडल्या. अनेक मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने त्यांना निवडणुकीतून माघार घेण्यासाठी नेतेमंडळी गळ घालत होते. शहराच्या विविध भागात त्यासाठी बैठका सुरू होत्या. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे आ. आशुतोष काळे यांच्या बंगल्यावर बसून सूत्र हलवत होते. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांच्या बंगल्यावरही माजी आ. नरेंद्र घुले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आ. सुधीर तांबे यांच्यासह पदाधिकार्यांच्या बैठका सुरू होत्या. तर खा. सुजय विखे विळद घाटातील कार्यालयात बैठका घेत होते. अर्ज माघारीची मुदत संपेपर्यंत या बैठका व फोनाफोनी सुरू होती. चर्चेच्या फेर्या झडत होत्या.
