। मुंबई । जानेवारी । मराठी चित्रपटसृष्टीत ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर लवकरच अभिनेत्री मिताली मयेकरशी लग्नगाठ बांधणार आहे. सध्या या दोघांच्याही घरी लग्नाची तयारी सुरू आहे.
नुकतंच या दोघांचं ‘साऊथ स्टाइल’मध्ये केळवण पार पडलं. याचे फोटो सिद्धार्थ आणि मितालीने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यात सिद्धार्थ आणि मिताली दाक्षिणात्य पारंपरिक पोशाखात पाहायला मिळत आहेत.
अभिनेत्री आरती वडगबाळकर आणि आशुतोष परांडकर यांनी सिद्धार्थ-मितालीचा पाहुणचार केला. यावेळी धुरळा या चित्रपटाचा लेखक क्षितिज पटवर्धन व त्याची पत्नीसुद्धा उपस्थित होती. काल पहिल्यांदा गोरेगाव ईस्टमध्ये साऊथ बघायला मिळालं, असं मजेशीर कॅप्शन देत सिद्धार्थने हे फोटो पोस्ट केले आहेत.
खरंतर लग्नाआधी वधू-वरासाठी केले जाणारे हे केळवण म्हणजे सर्वांनी एकत्र भेटण्याचे निमित्त असते. यावेळी वधू-वराला जेवणासाठी आमंत्रित करून त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवले जातात. तसेच एखादी भेटवस्तू देऊन त्यांना लग्नाबाबत शुभेच्छा दिल्या जातात.
Tags:
Entertainment

