चार जखमी : चौघांविरुध्द गुन्हा दाखल
। अहमदनगर । दि.21 जानेवारी । ग्रामपंचायत निवडणूकीत मतदान न केल्याच्या रागातुन चौघांनी काठी व दगडांनी मारहाण केली. या मारहाणीत चौघे जखमी झाले. हि घटना पारनेर तालुक्यातील बाबुर्डी येथे सोमवारी (दि.18) दुपारी 1 वाजता घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, येथील निलेश तात्याबा दिवटे (वय 30, रा.बाबुर्डी, ता.पारनेर) यांनी ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवार मिराबाई भास्कर गाडगे यांना मतदान केले नाही, याचा राग येऊन आबासाहेब सोनबा गाडगे, सुभाष सोनबा गाडगे, छगन सोनबा गाडगे,
संतोष दादाभाऊ गाडगे (सर्व रा.माळवाडी, बाबुर्डी ता.पारनेर) यांनी निलेश तात्याबा दिवटे, अकुंश गाडगे, विशाल गाडगे, विकाकस गाडगे (सर्व रा.बाबुर्डी ता.पारनेर) यांना तू आमचे जागेवर लावलेली टपरी काढून टाक नाहीतर तुला जिवेच ठार मारू अशी धमकी दिली.
याबाबत निलेश दिवटे व त्यांचे सहकारी त्यांना विचारणेस व समजावुन सांगणेसाठी गेले असता आबासाहेब गाडगे याने काठीने विकास गाडगे यांच्या डोक्यात मारली.
सुभाष गाडगे याने खाली पडलेला दगड विशाल गाडगे यांच्या डोक्यात मारला. छगन गाडगे याने अंकुश गाडगे यास काठीने मारहाण केली. संतोष गाडगे याने निलेश दिवटे यांच्या डोक्यात दगडाने मारहाण केली.
या मारहाणीत निलेश दिवटे, विलास गाडगे, विशाल गाडगे, अंकुश गाडगे हे जखमी झाले. या प्रकरणी निलेश दिवटे यांच्या फिर्यादीवरुन सुपा पोलिसांनी चौघां विरुध्द ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केल्या प्रकरणी त्यांच्या विरुध्द भादवि कलम 307,34,506 प्रमाणे खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयाची नोंद केली असुन अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक कोसे हे करीत आहे.
