। अहमदनगर । दि.16 जानेवारी । जामखेड तालुक्यातील घोडेगाव येथील शेतकरी दत्तात्रय अडसूळ यांनी कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या केली. या आत्महत्याग्रस्त कुटूंबांची आ. रोहीत पवार यांनी भेट देऊन सांत्वन केले. शासकीय मदत व कुटुंबातील एकाला साखर कारखान्यात नोकरी देण्याचे आश्वासन दिले.
आ.रोहीत पवार यांच्या आश्वासनामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. दत्तात्रय आडसूळ (रा. घोडेगाव) ता. जामखेड यांनी खाजगी सावकाराचे कर्ज व घोडेगाव सेवा संस्थेचे थकीत ८० हजाराचे कर्ज यासाठी होणारा तगादा यामुळे त्यांनी कारखान्याची ऊसतोड सोडून गावी घोडेगाव येथे परतले.
खाजगी सावकाराच्या तगाद्यामुळे जिरायत पावणेतीन एकर शेत विकण्याचा निर्णय घेतला. परंतु सौदा फिसकटला यामुळे हताश होऊन दत्तात्रय अडसूळ यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रशासनाने तातडीने अडसूळ यांच्या घरी जाऊन पंचनामा केला व जिल्हाधिकारी यांच्याकडे मदतीचा प्रस्ताव पाठविला.
तसेच आ.रोहित पवार यांनी सदर कुटुंबाचे फोन वरून सांत्वन केले होते व दि. १४ रोजी भेट देण्याचे मान्य केले होते. आ.रोहीत पवार यांनी यांनी घोडेगाव येथे दि. १४ रोजी अकराच्या सुमारास भेट दिली यावेळी राष्ट्रवादी चे युवा नेते माऊली भोंडवे, प्रा. लक्ष्मण ढेपे, गणेश पाटील, बापू भोंडवे आदी उपस्थित होते.
यावेळी सदर कुटुंबाने हंबरडा फोडीत आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी आ.रोहीत पवार यांनी सदर कुटुंबाला शासकीय मदत मिळावी, यासाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली जाईल तसेच कुटुंबातील एक जणाला साखर कारखान्यात नोकरी लावून देण्याबाबत आश्वासन दिले.
