। अहमदनगर । दि.16 जानेवारी । टाळेबंदी काळात गरजूंना जेवण पुरविण्यासाठी सुरु झालेल्या घर घर लंगरसेवेच्या वतीने शहरातील कोरोनाचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या युनानी काढा वाटप मोहिमेची सांगता नुकतीच शुक्रवारी (दि.15 जानेवारी) झाली.
अहमदनगर पोलीस दल, लायन्स क्लब अहमदनगर आणि अहमदनगर प्राईड यांच्या वतीने मागील सहा महिन्यापासून काढा वाटप सुरु करण्यात आले होते. या उपक्रमास नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा पहिला टप्पा सुरु झाला असून, कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी झाली असल्याने शहरात काढा वाटप मोहिम बंद करण्यात आली असल्याची माहिती हरजितसिंह वधवा यांनी दिली.
शहरात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली होती. कोरोनाचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी घर घर लंगरसेवेच्या वतीने नागरिकांना सकाळी विविध भागात युनानी काढा वाटपाची सुरुवात 10 ऑगस्ट पासून सुरु करण्यात आली होती.
लंगरसेवेच्या वतीने दररोज सकाळी प्रोफेसर कॉलनी चौक, आनंदधाम, तारकपूर, मंगल गेट, भिंगार, पारिजात चौक, गोविंदपुरा, पंजाबी कॉलनी, आलमगीर चौक, चितळे रोड, माळीवाडा, गुरु अर्जुन देव कोवीड सेंटर, आनंदऋषीजी हॉस्पिटल आदी शहरातील प्रमुख चौकात नागरिकांना मोफत काढा वाटप सुरु होते.
19 आयुर्वेदिक घटक यांचा मिश्रण असलेला युनानी काढा नागरिकांच्या आरोग्यासाठी फायद्याचा ठरला आहे. या उपक्रमास नागरिकांचा चागला प्रतिसाद लाभला. 30 लिटरपासून या काढा वाटपाची सुरुवात झाली.
दररोज 200 ते 300 लिटर काढा विविध भागात वाटप केले जात होते. साधारण साडेतीन ते चार हजार लोक प्रतिदिवस या काढ्याचा लाभ घेत होते. काढा वाटपाची सेवा मागील एक महिन्यापासून रामसिंग कथुरिया, सुनिल थोरात, दलजितसिंग वधवा यांनी प्रोफेसर कॉलनी चौक व श्रीराम चौक येथे अविरत सुरु ठेवली होती.
या सेवेसाठी हरजितसिंह वधवा, पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके, राहुल बजाज, प्रशांत मुनोत, सुनील छाजेड, सनी वधवा, टोनी कुकरेजा, दीपक कुकरेजा, विपुल शहा, कैलाश नवलानी, बल्लू सचदेव, पुनीत भुटाणी, कैलाश नवलानी, करण धुप्पड, कमलेश गांधी, किशोर मुनोत, अमरजीतसिंग वधवा यांनी योगदान दिले.
