नगर, (दि.29 डिसेंबर) : दिवंगत नेते स्व. एकनाथराव तथा बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) यांनी अडचणीच्या वेळी नेहमीच सामान्य माणसांना मदत केली व आधार दिला. आजीवन लोकांच्या हृदयामध्ये स्थान मिळवणाऱ्या आणि आजही खासदार साहेब म्हणून सर्वसामान्यांच्या मनामध्ये असणार्या दिवंगत एकनाथराव तथा बाळासाहेब विखे पाटील यांचा चौथा स्मृतिदिन बुधवार, दिनांक ३० डिसेंबर २०२० रोजी आहे.
त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त माजी मंत्री व आमदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विखे पाटील फाउंडेशन, विळद्घाट, अहमदनगर येथे विविध उपक्रमांचे आयोजन केल्याची माहिती संस्थेचे सचिव लेफ्ट. जन. डॉ. बी सदानंद (निवृत्त) यांनी दिली.
बुधवार, दिनांक ३० डिसेंबर २०२० रोजी डॉ. विखे पाटील फाऊंडेशन तर्फे रक्तदान शिबीर, मोफत मधुमेह व रक्तदाब तपासणी शिबिराचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर करोना काळामध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता समाजासाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या करोना योद्ध्यांचा गौरव यावेळी करण्यात येणार आहे
तसेच या वेळी मोफत श्रवण तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्याचबरोबर अक्सेसीबल इंडिया कॅम्पेन अंतर्गत जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्रामार्फत दिव्यांगांना साहित्य वाटप करण्यात येणार आहे. दिव्यांगाना मुळ प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार साहेबांचा मोलाचा वाटा राहीलेला आहे.
शेती, सहकार, पाणी अशा अनेक क्षेत्रात सामाजिक बांधिलकी द्वारे योगदान देणारे दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या चौथा स्मृतिदिन आयोजित या उपक्रमाद्वारे त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यास मदत होईल. वरील उपक्रमांसाठी 90 22 14 70 60 , 85 54 990 233 या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा असे आव्हानही आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.