जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी, कामगारांचा मोर्चा


नगर, (दि.26 नोव्हेंबर) : 26 नोव्हेंबरच्या देशव्यापी संपाच्या पार्श्‍वभूमीवर अहमदनगर जिल्हा कामगार आणि किसान संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चाची सुरुवात करण्यात आली.


नगर-पुणे महामार्गावरुन जिल्हाधिकारी कार्यालया जवळील भूजलसर्व्हेक्षण कार्यालयाच्या आवारात मोर्चा धडकला. मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. आंदोलकांनी कामगार, शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ केंद्र सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली. 


या मोर्चात हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, आयटकचे अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे, अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, बहिरनाथ वाकळे, रामदास वागस्कर, अंबादास दौंड, नंदू डहाणे, सिटूचे कॉ. महेबुब सय्यद, संताराम लोणकर, महादेव पालवे, सरकारी कर्मचारी संघटनेचे सुभाष तळेकर, रावसाहेब निमसे, विलास पेद्राम


आदींसह शिक्षक संघटनेचे आप्पासाहेब शिंदे, महेंद्र हिंगे, राजेंद्र लांडे, प्रशांत म्हस्के, किसान सभेचे विकास गेरंगे, विडी कामगार युनियनच्या भारती न्यालपेल्ली, सतीश भुस, अर्शद शेख, नंदकुमार शिरोळे, शिक्षकेतर संघटनेचे भाऊसाहेब थोटे, सतीश पवार, योगेश गलांडे, आकाश दंडवते, अंगणवाडी सेविका संघटनेच्या शोभा तरोटे, विजया घोडके, सुभाष कांबळे आदी सहभागी झाले होते.


भूजलसर्व्हेक्षण कार्यालयाच्या आवारात झालेल्या सभेत प्रमुख वक्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणा विरोधात जोरदार टिका करुन सरकार शेतकरी, कामगार, शिक्षक आदी सर्व घटकांना देशोधडीला लाऊन भांडवलदारांचे हित जोपासत असल्याचा आरोप करण्यात आला.


टाळेबंदी काळात कामगार विरोधी घेतलेले निर्णय, खाजगीकरण व कंत्राटीकरणाने राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षकांच्या आर्थिक सेवा व हक्क विषयक अस्वस्थता निर्माण झाली असल्याने हे हक्क आणि अधिकार अबाधित ठेऊन केंद्र सरकारने घेतलेल्या कामगार व शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी या मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते.


या मोर्चात प्रत्येक संघटनेशी संलग्न युनियन, शेतकरी, कामगार, सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर, अंगणवाडी सेविका, आशा-गटप्रवर्तक, विडी कामगार, पतसंस्था कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, बाजार समिती, हमाल-मापाडी संघटनांनी उत्सफुर्तपणे सहभाग नोंदवून जिल्ह्यात बंद यशस्वी केला. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तहसिल कार्यालयावर मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते.

Post a Comment

Previous Post Next Post