काष्टी येथे ट्रकचालकाला ७३ हजाराला लुटले


श्रीगोंदे,  (दि.29 नोव्हेंबर)  : अकलूजमधून साखर पोते घेऊन दौंड-नगर महामार्गावरून नगरकडे जाताना श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी येथे परिक्रमा कॉलेजच्याजवळ अकराच्या सुमाराला ट्रकला चार जणांनी अडवून चालक समरत बेरूलाल धनगर, मध्यप्रदेश याच्याकडील ७३ हजार रुपये लुटण्याचा प्रकार घडला. याबाबत श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


मध्यप्रदेशातील समरत धनगर हा ट्रकचालक १८ टायरच्या गाडीत साखर पोते घेऊन जात होता. पाठीमागून दोन दुचाकीवरून आलेल्या चार चोरट्यांनी ट्रक बाजूला घेण्यास सांगितले. त्यातील दोघांनी ट्रकच्या कॅबिनमध्ये येऊन गाडीची तपासणी करायची आहे, असे सांगितले. 

 

तपासणी करताना कॅबिनमधील टूलबॉक्समध्ये ठेवलेले ७३ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर दोन्ही मोटारसायकलने ते दौंडच्या दिशेने निघून गेले. चालकाने ट्रकमालकास फोनद्वारे माहिती दिली. याप्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात घटनेची फिर्याद चालकाने दिली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक रामराव डिकले करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post