भिंगारामध्ये यंदा साधेपणाने साजरा होणार गणेशोत्सव

नगर (दि.19 ऑगस्ट) :  कोरोना कोविड संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर भिंगार येथे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने पण भक्तीमय वातावरणात साजरा करण्याचा निर्णय मानाच्या गणपतीसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी नुकताच घेतला आहे. तर काही मंडळांनी गणेशोत्सव साजरा  करणार  नसल्याचे  जाहीर  केले  आहे.

भिंगार येथील देशमुख सांस्कृतिक हॉल मध्ये कॅम्प पोलिसांनी येथील शांतता समिती सदस्य व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांची गणेशोत्सवानिमित्त बैठक घेतली.

शहर विभागाचे पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी कॅम्पचे सपोनि प्रविण पाटील, छावणी परिषदेचे वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक रमेश साके, महावितरणचे अभियंता शेख, नागरदेवळे व वडारवाडी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक उपस्थित होते.

यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करायचा आहे. गल्लीत-चौकात अथवा मोकळ्या पटांगणात मंडप उभारुन गणेशमूर्तीची प्रतिष्ठापणा आरास-देखावे करणार नाहीत. विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम यास शासनाने प्रतिबंध केलेला आहे.

मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या घरात, सुरक्षितस्थळी गणेशमूर्ती स्थापन करता येईल, असे मिटके यांनी सांगितले. बैठक संपताच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी गणेशोत्सव साजरा करणार नसल्याचे निवेदन कॅम्प पोलिस ठाण्यात दिले.

Post a Comment

Previous Post Next Post