सातारा, ( दि.02 जुलै ) : राज्यातील ज्येष्ठ कलाकारांना राज्य शासनाकडून अ,ब,क आणि ड
श्रेणीनुसार कलाकार मानधन दिले जाते. सदरचे मानधन कोरोनामुळे गेल्या तीन
ते चार महिन्यांपासून वितरित करण्यात आलेले नाही. ते त्वरित वितरित करावे.
भविष्यात हे मानधन नियमित वेळेत मिळावे, राज्यातील नाट्यगृह आणि ग्रंथालये
पुरेशी सुरक्षा घेवून सुरू करण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा यासह
तमाशा-बारी लोककलावंतांचे दैनंदिन जीवन कोरोनामुळे असह्य झाले आहे.
त्याकरिता लोककलाकारांना शासनाने भरीव मदत करावी अशा मागण्या खा.उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्या आहेत.
राज्य शासन ज्येष्ठ कलाकारांना त्यांच्या पात्रता श्रेणीनुसार ठराविक मानधन प्रदान करत असते. तथापि हे मानधन कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर संबंधित ज्येष्ठ कलाकार व्यक्तींना वितरित करण्यात आलेले नाही. सदरचे मानधन तोकडे असले तरी मावळतीचा सूर्य बघत असलेल्या ज्येष्ठ कलाकारांना त्याचा मोठा आधार असल्याने हे मानधन एकरकमी, राज्यभरातील सर्व संबंधितांना तातडीने प्रदान करण्याची कार्यवाही करावी, अशी सूचना खा. उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
Tags:
Maharashtra
