गावाच्या ओढीने निघालेले ऊसतोडणी कामगार नाथप्रसाद घेताना भारावले

 
बा कान्होबा तुझी अशीच किरपा र्‍हाऊ दे

गावाच्या ओढीने निघालेले ऊसतोडणी कामगार नाथप्रसाद घेताना भारावले

श्रीकानिफनाथ देवस्थानकडून गरीब गरजूंना नाथप्रसादाचे वाटप
 
 

नगर (दि.07) : जागतिक महामारी कोरोनापासून बचाव करण्यासाठी जीव मुठीत घेऊन गड्या आपला गावचं बरा, असे म्हणत गावाकडं परतत असलेल्या ऊसतोडणी कामगारांच्या हाती श्रीक्षेत्र मढी येथील श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचा नाथप्रसाद मिळताच तो डोक्याला लावून बा कान्होबा आम्हा समद्यांवर तुही असीच किरपा र्‍हाऊ दे, असे शब्द उमटले. पोट भुकेने व्याकूळ झालेले असताना पुढ्यात आलेला नाथप्रसाद घेताना ऊसतोडणी कामगार भारावून गेले.



श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या कार्यरत विश्वस्त मंडळामधील अध्यक्ष शिवशंकर राजळे, उपाध्यक्ष सुनिलराव सानप, विश्वस्त आप्पासाहेब मरकड व मिलिंद चवंडके यांनी देवस्थानची सामाजिक बांधिलकी या सद् भावनेतून कोरोना महामारीच्या संकटामध्ये गोर-गरीब गरजूंना तसेच बंदोबस्ताची ड्युटी करत असलेल्या पोलिस बांधवांना, रूग्णालयातील रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना, रस्त्याच्या कडेला आसरा घेत असलेल्या निराधारांना, दरमजल करत निघालेल्या प्रवाशांना, पाथर्डी तालुक्यात परतू लागलेल्या ऊसतोडणी कामगारांना अन्नदान करण्याचे महत्वपूर्ण पाऊल उचलले.
 
श्रीकानिफनाथ देवस्थानकडे येणारे पंचक्रोशीतील रस्ते आणि मढी गावामध्ये सर्वत्र देवस्थानच्यावतीने औषध फवारणी केल्यानंतर लगेचच भुकेलेल्यांना माध्यान्ह भोजन देण्यासाठी विशेष दक्षता घेऊन तयार केलेले फुडपाकिट पुरवण्याचे नियोजन करण्यात आले. पंचक्रोशीसह नगर जिल्ह्यामधील नाथभक्तांमधून या अन्नदान सेवेचे कौतुक होऊ लागले आहे.
 
कोरोनाचा प्रादुर्भाव गावात व परिसरात होऊ नये म्हणून श्री क्षेत्र मढी येथील प.पू.कानिफनाथांचे संजीवन समाधी मंदिर दैनंदिन पुजाविधी व्यतिरिक्त दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले आहे. गुढीपाडव्याच्या पहाटे होणारा सामुदायिक महापूजा सोहळा शासकीय आदेशान्वये रद्द करण्याचाही निर्णय याच कार्यरत विश्वस्तांनी घेतला होता.

देवस्थानचे अध्यक्ष शिवशंकर राजळे, उपाध्यक्ष सुनिलराव सानप, विश्वस्त आप्पासाहेब मरकड व मिलिंद चवंडके यांनी दिलेल्या सुचनांनुसार देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोकराव पवार, व्यवस्थापक बाबासाहेब मरकड, कर्मचारी संजय मरकड, संतोष मरकड, अविनाश मरकड, सुरेश मरकड, विजय रासकर, अशोक मरकड, राधाकृष्ण मरकड, बबन मरकड, पाराजी मरकड, अर्जुन मरकड आणि शिवाजी मरकड हे या सामाजिक कार्यासाठी सर्व दक्षता घेत परिश्रम घेऊ लागले आहेत.
 
चिंचपूर रोडवरील पाथर्डी ग्रामीण रूग्णालय, नगर-पाथर्डी रोडवरील आरोग्यमाता केंद्र, पोलिस स्टेशन, तहसील कार्यालय, सेतू कार्यालय यासह रस्त्यामध्ये आढळणारे गोर-गरीब भुकेले अशा सर्वांनाच फुडपाकिटचे वितरण करण्यात आले.
 
श्रीकानिफनाथ देवस्थानच्या अन्नछत्रमध्ये सर्व काळजी घेऊन तयार करण्यात आलेले दर्जेदार अन्नपदार्थ उत्तम पॅकिंग करून भुकेल्या गरजूंना ते जेथे आहेत तिथेच पोहोच करण्याच्या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. देवस्थानकडून अत्यंत प्रभावीपणे कोरोनाविषयी जनजागृतीही करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post