शहर काँग्रेसचा ‘दिया नही, गरिबोंके घर चुल्हा जलाव’ उपक्रम

 शहर काँग्रेसचा  ‘दिया नही, गरिबोंके घर चुल्हा जलाव’ उपक्रम

नगर (दि.05) : पंतप्रधान यांच्या पाच तारखेला रात्री नऊ वाजता नऊ मिनिटे दिवे लावण्याच्या आवाहनाला बगल देत नगर शहर काँग्रेसने रात्री ठीक नऊ वाजता गरीब वस्तीतील हातावरती पोट भरणाऱ्या कुटुंबीयांच्या घरात चूल पेटवून दिया नही, हम गरिबोंके घर चूल्हा जालायेंगे असे म्हणत गरिबांच्या पोटातील आग विझवण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन शहर काँग्रेसचे युवा नेते किरण काळे यांनी केले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी पंतप्रधानांच्या दिवे लावण्याच्या आवाहना नंतर मोदींना देशावरील संकटाचे गांभीर्य नसल्याची टीका केली होती.

याच धर्तीवर शहर काँग्रेसने मोदींच्या वतीने देशवासीयांना करण्यात आलेल्या आवाहनाला फाटा देऊन कोरोनाच्या संकटाचे गांभीर्य लक्षात घेत दिवे लावण्याच्या इव्हेंट मध्ये सहभागी न होता अन्नधान्याचे, जीवनावश्यक वस्तूंचे प्रत्यक्षात वाटप करीत गरिबांच्या झोपडीत चूल पेटविण्याचा उपक्रम राबवला.

किरण काळे म्हणाले की, पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे दिवे लावण्यासाठी आज देशातील अनेक गरिबांच्या घरामध्ये तेल राहिले नाही तेव्हा हातावर पोट असणारे गरीब लोक दिवे  लावू शकतील अशी त्यांची परिस्थिती नाही.

आम्ही शहर काँग्रेसच्या वतीने सुरू केलेल्या हेल्पलाईन वरती शहराच्या कानाकोपर्‍यातून अनेक गरजू बांधवांचे आम्हाला फोन येत आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्यापर्यंत जीवनावश्यक वस्तू, किराणा सामान पोहोचवण्याचे काम अहोरात्र करीत आहेत. आतापर्यंत एकूण ४५० हून अधिक गरजूंपर्यंत आम्ही मदत पोहोचवली असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.

काँग्रेस कायम संकटाच्या काळामध्ये देशवासीयांच्या पाठीशी उभी राहिली आहे. युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित (दादा)  तांबे पाटील यांच्या संकल्पनेतून नगरसह राज्यभर रक्तदान शिबीराचे  यशस्वी आयोजन करण्यात आले असून आतापर्यंत दहा हजारांहून अधिक युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान केले आहे. पुढील काळात देखील ना.बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते कोरोनाच्या  संकट काळात नगरकर नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे काम करीत राहतील, असे काळे यांनी म्हटले आहे.

यावेळी सागर काळे, राहुल चिखले, ओमकार भोसले, अभिजीत कुलकर्णी, स्वप्नील पाठक, निखिल खजिनदार, संदीप भिसे, आदित्य काळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post