कोरोनाचे गंभीर संकट ओळखा आणि घरातच सण, उत्सव साजरे करा : ना.बाळासाहेब थोरात

यात्रा, धार्मिक कार्यक्रम, जयंती-पुण्यतिथीच्या सार्वजनिक 
कार्यक्रमांना  परवानगी न देण्याच्या प्रशासनाला सूचना

संगमनेर (दि.05) : कोरोना संकटाचे गांभीर्य लक्षात घेता सरकारने सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथीच्या सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी न देण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. या सोबतच प्रदेश कॉंग्रेसच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे सार्वजनिक कार्यक्रम दरवर्षी होत असतात, ते रद्द करत असल्याची घोषणा करून त्या दिवशी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे वाचन करून त्यांना अभिवादन करु या, असे आवाहन महसूलमंत्री व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नामदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

ना.थोरात पुढे म्हणाले की, कोरोना विरोधातील लढाई निर्णायक वळणावर आली आहे, आतापर्यंत जी एकजूट आणि जिद्द दाखविली तिचे कौतुक आहे. आता कसोटीचा काळ सुरु झाला आहे. गुढी पाडवा, राम नवमी, पंढरपूरची वारी आपण सर्वांनी घरात राहूनच साजरी केली, असेच सामाजिक भान यापुढेही ठेऊन कोणत्याही जातीचा, धर्माचा असा विचार करुन सण उत्सव साजरे करण्यासाठी गर्दी करण्याची आवश्यकता नाही. येणारी महावीर जयंती, हनुमान जयंती, शब्ब-ए-बारात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हे उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे न करण्याचे आवाहन मी राज्यातील जनतेला करतो आहे.

आपण बाहेरील देशातून, बाहेरील राज्यातून आलेला असाल तर तपासणीसाठी स्वयंस्फूर्तीने पुढे या. निजामुद्दीनहून आलेल्या नागरिकांच्या संपर्कात कोणी आलेले असेल तर त्यांनी स्वत:हून प्रशासनाला कळवावे. आपल्यासाठी व आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी हे महत्वाचे आहे. अन्यथा प्रशासन सक्तीने कारवाई करेल, तसे अधिकार त्यांना दिलेले आहेत. त्याचबरोबर सामाजिक तेढ निर्माण होईल असे कृत्य कोणीही करू नये. खोटे व्हिडीओ, बातम्या पाठवून वातावरण बिघडवू नये, प्रशासन कामाच्या तणावाखाली आहे, त्यांना सहकार्य करावे.

Post a Comment

Previous Post Next Post