सेवानिवृत्त उपप्राचार्य अरविंद गोरेगांवकर यांना देवाज्ञा


सेवानिवृत्त उपप्राचार्य अरविंद गोरेगांवकर यांना देवाज्ञा

नगर (दि, 04) :येथील पेमराज सारडा कॉलेजचे सेवानिवृत्त उपप्राचार्य अरविंद रामकृष्ण गोरेगांवकर ( वय ६६, रा. हरिओम, आनंदीबाजार, नगर ) यांची प्राणज्योत २९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता दिर्घकालीन आजाराने राहत्या घरी मालवली. अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे एक बहिण श्रीमती आशाताई, एक भाऊ अनंत, भावजय सौ.वैशाली, चुलते वसंतराव आणि पुतणे असा परिवार आहे.

हिंद सेवा मंडळाच्या पेमराज सारडा कॉलेजमध्ये १९७६ ते २०१२ दरम्यान त्यांनी भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ज्ञानदान केले. इयत्ता १२ वीच्या बोर्डाच्या परिक्षेत आपल्या कॉलेजचे विद्यार्थी असलेच पाहिजेत, या तळमळीने ते विद्यार्थ्यांकडून अभ्यास करवून घेत. कॉलेजचे उपप्राचार्य म्हणून ते सेवानिवृत्त झाले. २००४ साली महाराष्ट्र शासनाने राज्य शिक्षक पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले होते.

चौपाटी कारंजा चौकातील शिवप्रधान दत्त मंदिराचे ते वंशपरंपरागत पुजारी व विश्वस्त होते. गर्भगिरीतील पहिल्या नाथ संमेलनात दत्त संप्रदाय व नाथ संप्रदाय या विषयावर त्यांनी मांडलेले विचार प्रेरणादायी ठरले होते. खगोलशास्त्राचा त्यांचा गाढा अभ्यास होता. चंद्र व सूर्यग्रहण होण्यातील वैज्ञानिक चिंतन वृत्तपत्रांमधून मांडणारे ते नगरमधील पहिले खगोल अभ्यासक होते. विज्ञानामधील खुबी व शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधांविषयी त्यांनी वृत्तपत्रांमध्ये विपुल लेखन केले. अध्यात्म व विज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे विविध उदाहरणे देऊन सांगताना ते रमून जात.

महानगरपालिका शिक्षण मंडळ आदर्श शिक्षक पुरस्कार निवड समितीचे मुख्य परिक्षक म्हणून त्यांनी समर्थपणे कार्यभार सांभाळला. प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय व्यवस्थापन विकास समितीवर तज्ज्ञ संचालक म्हणून ते कार्यरत होते.

Post a Comment

Previous Post Next Post