नगर : शिवसेनेचे कोपरगाव उपतालुकाप्रमुखाची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना रविवारी समोर आली आहे. याच घटनेवरून महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. या हत्यानंतर तरी सरकाराला जाग येणार का ? असा सवाला त्यांनी उपस्थित केला आहे.
नगर जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक इशू सिंधू हे लंडनला दोन वर्षाच्या शिक्षणासाठी गेल्याने नगरचे पोलिस अधीक्षकपद गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त झाले आहे. सध्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्याकडे या पदाचा कारभार आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पूर्णवेळ पोलीस अधीक्षक देण्याची मागणी होत आहे. मात्र याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळाले.
याच मुद्यावरून तांबे यांनी महाविकास आघाडी सरकाराला घराचा आहेर दिला आहे. तांबे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, अहमदनगरसारख्या संवेदनशील व राज्यातील सर्वात मोठय़ा जिल्ह्याला गेले ३ महिने पूर्णवेळ पोलीस अधिक्षक नाहीत. त्यामुळे आता शिवसेना नेत्याची हत्या झाल्यावर तरी सरकारला जाग येणार आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. भोजडे गावात शिवसेनेचे कोपरगाव उपतालुकाप्रमुख सुरेश शामराव गिरे यांच्यावर चारचाकी वाहनातून येऊन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या हल्ल्यात गिरे हे जागीच ठार झाले.
Tags:
Ahmednagar
