राहीबाई पोपेरे यांचे कार्य नगर जिल्ह्यासाठी भूषणावह : एकनाथ ढाकणे
पद्मश्री पुरस्काराबद्दल राहीबाईंचा ग्रामसेवक युनियनतर्फे सत्कार
नगर (दि.11) : सध्याच्या काळात सेंद्रीय शेती व सेंद्रीय कृषी उत्पादनांचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशावेळी अकोले तालुक्यासारख्या दुर्गम भागात विविध पिकांच्या दुर्मिळ बिजाची बँक तयार करून पारंपरिक कृषी संस्कृतीचा हा अनमोल ठेवा जतन करण्याचे काम राहीबाई पोपेरे करीत आहेत. संपूर्ण देशात राहिबाई यांची बियाणे बँक नावाजली जात आहे. या कार्याबद्दल त्यांना केंद्र सरकारने प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार जाहीर केलेला आहे. ही संपूर्ण नगर जिल्ह्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. ग्रामसेवक आपापल्या गावात या बियाणे बँकेची माहिती पोहचवून राहीबाई यांचे कार्य सर्वांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतील. पद्मश्री पुरस्कार मिळवणारे राहीबाई पोपेरे, पोपटराव पवार हे नगर जिल्ह्याचे भूषण आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी केले.
अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथील राहीबाई पोपेरे यांना केंद्र सरकारने नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. याबद्दल महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन, अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक युनियनच्यावतीने पोपेरे यांचा कोंभाळणे येथे सत्कार करण्यात आला. यावेळी ढाकणे बोलत होते. यावेळी ग्रामसेवक पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र पावशे, सुनिल नागरे, मंगेश पुंड, नफीस पठाण, प्रदीप कल्याणकर, रवींद्र ताजणे, सुरेश मंडलिक, अविनाश मंडलिक, गणेश जोंधळे, बापूसाहेब राजळे, कदम महाराज, बाळासाहेब आंबरे, रमेश बांगर, शिवा पालवे, अहमद शेख, विशाल काळे, राकेश पाटील, अशोक नरसाळे, संदीप लगड, आदी उपस्थित होते.
राहीबाई पोपेरे यांनी ग्रामसेवक हे ग्रामीण भागाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचे सांगत त्यांच्याकडून झालेला सत्कार खूपच आनंददायी असल्याचे म्हटले. यावेळी ग्रामसेवकांनी पोपेरे यांच्या बियाणे बँकेची प्रत्यक्ष पाहणी केली. राहीबाईंनी अतिशय पारंपरिक पध्दतीने अनेक दुर्मिळ वाणांचे जतन केले आहे. त्यांच्या कार्याची प्रत्यक्ष माहिती घेवून सर्वांनी त्यांचे कौतुक केले.
Tags:
Ahmednagar
