बुरूडगाव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ !

। अहिल्यानगर । दि.02 एप्रिल 2026 । बुरूडगाव रोडवरील विनायकनगर, समता कॉलनी, फुलसौंदर मळा, तसेच सारसनगर येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला. चार चोरटे असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


यावेळी चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य केले. घरांचे कुलूप, कडी-कोयंडा तोडून घरफोड्या केल्या. यामध्ये किती ऐवज चोरीस गेला, याबाबतची माहिती समजू शकली नाही. माजी महापौर भगवान फुलसौंदर यांचे कार्यालयही चोरट्यांनी फोडले.


कार्यालयात पक्षाचे झेंडे, मतदारयाद्या होते. त्यामुळे चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. बुधवारी पहाटे 2 ते 3 च्या सुमारास चोरट्यांनी या परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.


दरम्यान, चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले असून सीसीटीव्हीमध्ये चार चोरटे दिसत आहेत. दोन चोरटे घरासमोर थांबल्याचे तर दोन चोरटे घरात शिरल्याचे सीसीटीव्हीत दिसून येत आहे. चोरट्यांच्या हातात कटर, धारदार शस्त्र तसेच गलोल आदी हत्यारे दिसत आहेत.

 

सारसनगर परिसरातही दोन-तीन ठिकाणी घरफोडी करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शहर व उपनगरात चोर्या व घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा तसेच रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post