| अहिल्यानगर | दि.30 मार्च 2026 | पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीमधील कंपनीला आज सकाळी भीषण आग लागली. या आगीमुळे कंपनीचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
सुपा येथील घाणेगाव परिसरात ही कंपनी आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, सदरची कंपनी ही प्लास्टिक उत्पादनाशी संबंधित असल्याने आगीने काही वेळातच उग्र रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.
अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. सुदैवाने, या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र कंपनीतील मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या कंपनीत यापूर्वीही मागील बाजूस आग लागल्याची घटना घडली होती. त्यावेळी आग नियंत्रणात आणण्यात यश आले होते. मात्र, यावेळी लागलेली आग अधिक भीषण असून दुपारपर्यंतही ती पूर्णपणे आटोक्यात आलेली नव्हती.
