। छत्रपती संभाजीनगर । 26 फेब्रुवारी 2026 । सुप्रसिद्ध व्याख्याते, कवी, लेखक, समीक्षक, सामाजिक ऐतिहासिक व राजकीय अभ्यासक व विश्लेषक डॉ. शिवानंद नारायणराव भानुसे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खा. श्री. शरदचंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने, पक्षाचे सरचिटणीस रवींद्र पवार यांनी २४ फेब्रुवारी २०२६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे.
डॉ. शिवानंद भानुसे हे गेल्या २५ वर्षापासून संभाजी ब्रिगेडमध्ये सक्रिय होते. संभाजी ब्रिगेडच्या व मराठा सेवा संघाच्या विविध पदावर त्यांनी उत्कृष्टपणे कार्य केले आहे. त्याचबरोबर नोव्हेंबर २०२४ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते म्हणून ते कार्यरत होते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलल्यानंतर नव्याने प्रदेश प्रवक्ते यांच्या नियुक्ती करण्यात आल्या. त्यामध्ये डॉ. शिवानंद भानुसे यांची वैचारिक प्रगल्भता, विविध विषयावर सखोल अभ्यास, वैचारिक चळवळीतील अनुभव व समाजकार्य आणि जनसामान्यांच्या प्रश्नांची असणारी सखोल जाण लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्तेपदी डॉ.शिवानंद भानुसे यांची नियुक्ती केली आहे.
डॉ. शिवानंद भानुसे हे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील विझोरा येथील रहिवासी असून, सध्या ते छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी महाविद्यालयात कार्यरत आहेत. सुप्रसिद्ध वक्ते, लेखक, कवी म्हणूनही त्यांचा महाराष्ट्राला परिचय असून त्यांनी २१ डिसेंबर २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या २० व्या. झेप साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्याचप्रमाणे त्यांचा विविध साहित्य संमेलनात व कवी संमेलनात सक्रिय सहभाग असतो. भारतीय संविधानाचे आणि मराठा व इतर आरक्षणाचे गाढे अभ्यासक म्हणून ते सुपरीचीत आहेत. गेल्या पंचवीस वर्षापासून त्यांचा विविध आंदोलनात सक्रिय सहभाग राहिलेला आहे.
ते उच्चशिक्षित असून सुसंस्कृत आणि विवेकवादी आहेत. विविध टीव्ही चॅनलच्या माध्यमातून विविध विषयावर चर्चेसाठी त्यांचा सातत्याने सहभाग असतो. संपूर्ण महाराष्ट्रभर व देशभर त्यांचे विविध विषयावर व्याख्याने सुरू असतात. विविध वर्तमानपत्रात, साप्ताहिक व मासिकातही त्यांचे सातत्याने लिखाण सुरू आहे. ते सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक व राजकीय अभ्यासक व विश्लेषक म्हणून सुपरीचित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
