जम्मू-काश्मीरमध्ये अपघातात दहा जवांनाचा मृत्यू

| डोडा | दि.23 जानेवारी 2026 | जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात गुरुवारी सकाळी लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात झाला. भद्रवाह-चंबा मार्गावरील खन्नी टॉप परिसरात हे वाहन सुमारे 200 फूट खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत देशाच्या 10 जवानांनी प्राण गमावले असून आणखी 10 जवान गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लष्कराची एक तुकडी ऑपरेशनल जबाबदारीसाठी सकाळी रवाना झाली होती. दुर्गम आणि डोंगराळ भागातून जात असताना तीव्र वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन थेट खोल दरीत कोसळले. वाहनात एकूण 20 जवान प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच लष्कर, पोलीस तसेच स्थानिक प्रशासनाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थिती आणि आव्हानात्मक वातावरण असूनही युद्धपातळीवर बचावकार्य राबवण्यात आले. घटनास्थळीच 10 जवानांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले, तर गंभीर जखमी अवस्थेतील 10 जवानांना तात्काळ उपचारासाठी बाहेर काढण्यात आले. जखमी जवानांना प्रथम भद्रवाह येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेता, पुढील उपचारांसाठी त्यांना हवाईमार्गे उधमपूर येथील लष्कराच्या कमांड रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या दुर्घटनेबाबत जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.


Post a Comment

Previous Post Next Post