पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र शासन भरीव मदत करणार : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र शासन भरीव मदत करणार : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरण शुभारंभ


। अहिल्यानगर/शिर्डी । 05 ऑक्टोबर 2025।  अतिवृष्टी व पुरामुळे महाराष्ट्रातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महाराष्ट्र शासनाकडून नुकसानीचा तपशीलवार अहवाल मिळताच केंद्र सरकार क्षणाचाही विलंब न करता शेतकऱ्यांसाठी भरीव मदत जाहीर करेल, अशी ग्वाही केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी दिली.

लोणी येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरण शुभारंभप्रसंगी श्री. शाह बोलत होते. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, 

उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री श्री. शाह म्हणाले, केंद्र सरकारने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ३ हजार १३२ कोटींची मदत मंजूर केली आहे. यापैकी एप्रिलमध्ये १ हजार ६३१ कोटी वाटप करण्यात आले असून, यात महाराष्ट्रासाठी २१५ कोटींचे विशेष मदत पॅकेज देण्यात आले आहे. कर्जवसुलीवर तात्पुरती स्थगिती व विद्यार्थ्यांसाठी परीक्षांमध्ये सवलती यांसारखे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.

👉 येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग  

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मविभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी सहकार आंदोलन, ग्रामीण विकास व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केलेले कार्य अभूतपूर्व आहे. त्यांच्या कार्याच्या पायावर आज महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र उभे आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, धनंजयराव गाडगीळ व वैकुंठभाई मेहता यांनी सहकार चळवळीची पायाभरणी केली. विखे पाटील यांनी देशातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू करून शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा पाया रचला. व्यापाऱ्यांच्या घरात जाणारा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात जाऊ लागला.


Post a Comment

Previous Post Next Post