शनिशिंगणापूर परिसरात 'कट्टा' विक्रीचा डाव उधळला
स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
गुप्त माहितीच्या आधारे कांगोणी गावातून तरुणाला ठोकल्या बेड्या
२ गावठी पिस्तुले व ८ जिवंत काडतुसांसह ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त
। अहिल्यानगर । दि. 29 ऑक्टोबर 2025 । जिल्ह्यातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी धडक कारवाईचे आदेश दिलेले असताना, स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) नेवासा तालुक्यात एक मोठी कारवाई केली आहे. शनिशिंगणापूर (ता. नेवासा) परिसरातील कांगोणी गावात गावठी पिस्तुले विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या.
भारत सोपान कापसे (वय २७, रा. मराठी शाळेजवळ, कांगोणी, ता. नेवासा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ६० हजार रुपये किमतीची दोन गावठी पिस्तुले (अग्निशस्त्रे) आणि ४ हजार रुपये किमतीची आठ जिवंत काडतुसे असा एकूण ६४ हजार रुपयांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी पोउपनि दीपक मेढे यांच्या नेतृत्वात एक विशेष पथक तयार केले होते. दिनांक २७ ऑक्टोबर रोजी हे पथक नेवासा परिसरात गस्त घालत असताना, कांगोणी येथील भारत कापसे हा तरुण गावठी पिस्तुले विक्रीसाठी आणणार असल्याची पक्की गुप्त माहिती पथकाला मिळाली.
👉 येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग
मिळालेल्या माहितीच्या आधारे, पथकाने तात्काळ कांगोणी गावात सापळा रचला व व्यावसायिक कौशल्याने आरोपी भारत कापसे याला शिताफीने ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. विक्रीसाठी आणलेली दोन पिस्तुले व काडतुसे राहत्या घरात लपवून ठेवल्याचे त्याने सांगितले. पथकाने त्याच्या घराची झडती घेतली असता, सदरचा ६४ हजारांचा शस्त्रसाठा आढळून आला.
याप्रकरणी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक सोमनाथ आसमानराव झांबरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी भारत कापसे विरोधात शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट कलम ३/२५, ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शनिशिंगणापूर पोलीस करत आहेत.
👉 येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग
ही कौतुकास्पद कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि किरणकुमार कबाडी, पोउपनि दीपक मेढे व पथकातील पोलीस अंमलदार राहुल द्वारके, शाहिद शेख, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, विशाल तनपुरे, भगवान थोरात, रमिझराजा आतार, प्रशांत राठोड, महादेव भांड यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
