चौंडीचा सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करा : प्रा. शिंदे

चौंडीचा सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करा : प्रा. शिंदे

। अहिल्यानगर । दि.28 फेब्रुवारी 2025 । पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने त्यांचे  जीवन आणि त्यांच्या कार्याचे सर्व पैलू देशवासियांना एकाच ठिकाणी पाहता व अनुभवता यावेत, यासाठी श्री क्षेत्र चौंडी विकासाचा सर्वसमावेशक असा बृहत विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले.

चौंडी येथे श्री क्षेत्र चौंडी बृहत विकास आराखड्याच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत प्रा.शिंदे बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर उपस्थित होते.

प्रा.शिंदे म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन आणि कार्य हे निःस्वार्थ सेवा, प्रशासनिक कुशलता आणि धार्मिक सहिष्णुतेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यांचे कार्य समाजातील प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठीच्या विकास आराखड्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच  बैठक घेणार आहेत. 

त्यामुळे प्रशासनाने या विकासाचा सुंदर, आकर्षक व नाविन्यपूर्ण संकल्पनेतून आराखडा तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या जीवनात कृषी, व्यापार विकास, आदर्श राज्यकारभार, धार्मिक स्थळांचा विकास व संवर्धन आदी बाबींना प्राधान्य दिले. देशातील बारा ज्योतिर्लिंगाच्या जीर्णोद्धाराचे कार्यही त्यांनी केले.

त्यांच्या देशभरातील कार्याचा इतिहास एकत्र करून ऐतिहासिक वारसा व आध्यात्मिक भावनेची जपणूक होईल यादृष्टीने त्याची प्रतिकात्मक स्वरूपात संग्रहालयातून मांडणी करण्यात यावी.

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग

विकास कामांना गती
सद्यस्थितीत प्रादेशिक पर्यटन योजना व ग्रामविकास विभागाच्या  ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभुत सुविधा पुरविणे या दोन योजनांतर्गत चौंडी येथे एकुण 24 कोटी 11 लाख रकमेच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे.प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत 9 कोटींची कामे  पूर्ण झाली आहेत. यापैकी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी  होळकर जन्मगाव चौंडी येथील गढीचे नूतनीकरण करणे, नक्षत्र उद्यान, संरक्षण भिंत बांधणे, चौंडी येथे उद्यानातील गढी व परिसरातील शिल्प,  मुख्य प्रवेशद्वार आदी कामे पूर्ण आहेत. तर संग्रहालय, सीना नदीवर पश्‍चिम बाजूस घाटाचे बांधकाम करणे आदी कामांना मंजुरी मिळाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post