। मुंबई । डिसेंबर । दि.03 डिसेंबर 2024 । राज्यात मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले नसले तरी, महायुतीच्या सरकारचा शपथविधी गुरूवारी 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेणार आहे. त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्रिपदाचे नाव अद्याप जाहीर केले नसले तरीही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील हे आता जवळपास निश्चित झाले आहे. मुंबईतील आझाद मैदानात हा शपथविधी सोहळा संपन्न होणार असून या सोहळ्यासाठीचा भव्य दिव्य मंच आणि जय्यत तयारी करण्यात आली आहे.
या शपथविधी सोहळ्यासाठी साधारणतः 30 ते 40 हजार लोक अपेक्षित आहेत. त्या अनुषंगाने आझाद मैदानात एकुण 3 स्टेज असणार आहे. मुख्य स्टेज हा 60 बाय 100 बाय 8 फुट असणार आहे. या मंचावर पंतप्रधान आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्री असतील. तर उजव्या बाजूला 80 बाय 50 बाय 7 फुट लांबीचा मंच असेल.
