प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
महापुरुषांच्या भूमीत लोकमान्यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हे सौभाग्य : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
लोकमान्य टिळकांना अपेक्षित देश घडविण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न : मुख्यमंत्री
। पुणे । दि.01 ऑगस्ट 2023 । पुणे ही छत्रपती शिवाजी महाराज, चाफेकर बंधू यांची भूमी आहे. या भूमीशी जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा आणि आदर्श जोडलेले आहेत. अशा भूमीत लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार मिळत आहे, हे आपले सौभाग्य आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यभूमीत मिळणारा पुरस्कार हा आपला सन्मान आहे, अशा शब्दांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
स.प. महाविद्यालय येथे प्रधानमंत्री श्री. मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक, विश्वस्त सुशीलकुमार शिंदे, डॉ. रोहित टिळक, गीताली टिळक, डॉ. प्रणती टिळक आदी उपस्थित होते. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले, लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यलढ्याची दिशाच बदलली. देशाची संस्कृती आणि परंपरा महान असल्याचा विश्वास लोकांमध्ये निर्माण केला. देश स्वतंत्र होऊ शकतो हा विश्वास लोकांमध्ये त्यांनी पहिल्यांदा निर्माण केला. देशासमोर सहकार्याचे मोठे उदाहरण ठेवले. स्वातंत्र्य लढ्यातील वर्तमानपत्राचे महत्त्व ओळखून त्यांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्र सुरू केली. स्वातंत्र्यासाठी इंग्रजांसोबत लढा देतानाच समाजातील वाईट प्रथांविरोधातही त्यांनी लढा दिला.
गीतारहस्याच्या माध्यमातून त्यांनी कर्मयोग सोप्या पद्धतीने सांगितला. त्यांचा लोकांवर विश्वास होता. असाच लोकांच्या कर्तृत्वावर, प्रामाणिकपणावर आमचाही विश्वास आहे. देशात विश्वासाने भरलेले सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. यामुळेच देश विकासाकडे वेगाने वाटचाल करीत आहे. लोकमान्य टिळकांच्या विचारांमधील देश निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
लोकमान्य टिळकांना समृद्ध, बलाढ्य, कर्तृत्ववान देशाची निर्मिती अपेक्षित होती. त्यासाठी त्यांनी देशामध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण केले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक युवकांनी त्याकाळी स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग घेतला. त्यापैकी महत्त्वाचे उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर हे होत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना इंग्लंडला जाऊन बॅरीस्टर होता यावे, यासाठी त्यांना शिष्यवृत्ती देण्याची शिफारसही टिळकांनी केली होती.
