। रायगड । दि.20 जुलै 2023 । रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असणार्या इर्शाळवाडीवर बुधवारी रात्री डोंगर कोसळला. रायगड जिल्ह्यात ईर्शाळगडावरच्या इर्शाळवाडीवर दरड कोसळल्यामुळे गावातल्या अनेक घरांवर अक्षरश: मातीचा ढीग झाला आहे. मात्र तुफान पाऊस आणि खराब हवामान यामुळे बचावकार्यात प्रचंड अडथळे येत आहेत.
यामुळे 40 घरांची वाडी ढिगार्याखाली गाडली गेली असल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली.
मध्यरात्रीच्या सुमारास आख्खा गाव पावसामुळे आपापल्या घरांत होता. घराघरांत निजानीज झालेली असतानाच ईर्शाळगडावरून भूस्खलन झालं आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं ! पक्का रस्त्ता नसल्यामुळे एनडीआरएफच्या सुरक्षा पथकांना जेसीबी, पोकलेनसारख्या मोठ्या यंत्रणा गावापर्यंत नेण्यात मोठ्या अडचणी आल्या.
त्यामुळे इतर हत्यारांच्या साहाय्यानेच मातीचा ढिगारा उपसण्याचं काम हाती घेतलं गेलं. या ढिगार्याखाली नेमके किती जण अडकले असावेत, याविषयी कोणतीही खात्रीशीर माहिती मिळत नसल्यामुळे नातेवाईकांच्या दु:खाला पारावार उरला नाही.
