जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी सभासदांसाठी आधारवड : येरेकर


। अहमदनगर । दि.11 जुलै 2023 ।  जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या वतीने सभासदांच्या सर्व प्रकारच्या आर्थिक गरजा भागविण्याबरोबरच दुर्देवाने मयत झालेल्या सभासदांच्या कुटुंबियांनाही आधार देण्याचे काम करत आहे. संस्थेने सभासदांसाठी सुरु केलेली अपघात विमा योजना ही खर्‍या अर्थाने मयत सभासदांच्या वारसांना दुखःत आधार देणारी आहे.त्यामुळे ही संस्था सभासदांसाठी आधारवड असल्याचे गौरवद्गार जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी काढले.

अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे सभासद कै.अशोक परशुराम व्यवहारे व कै.विनायक बन्सी कातोरे यांचा 2 महिन्यापूर्वी अपघाती मृत्यू झाला होता. या मयत सभासदांच्या वारसांना विमा कंपनीकडून मिळालेल्या प्रत्येकी 10 लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांच्यासह सर्व खातेप्रमुखांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी माहिती देताना संस्थेचे चेअरमन संजय कडूस म्हणाले, जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या वतीने सभासद कुटुंब आधार विमा योजनेतून संस्थेच्या सभासदांचा प्रत्येकी 10 लाखाचा अपघात विमा उतरविला आहे. 2 महिन्यापूर्वी दोघा कर्मचार्‍यांचा अपघाती मृत्यू झाल्यावर त्यांच्या वारसांना तातडीने विमा रक्कम मिळण्यासाठी संस्थेच्या वतीने विमा कंपनीकडे पाठपुरवा केला. अपघात विमा पॉलीसी योजनेतून मयत सभासदांच्या वारसांना विम्यापोटी 10 लाख रुपयांचा धनादेश मयत सभासद कै.अशोक परशुराम व्यवहारे यांच्या वारस पत्नी श्रीमती मीरा व्यवहारे व कै.विनायक बन्सी कातोरे यांच्या वारस पत्नी श्रीमती प्रमिला कातोरे यांना देण्यात आला.

यावेळी संस्थेचे चेअरमन संजय कडूस , व्हाईस चेअरमन भाऊसाहेब चांदणे, संचालक विलास शेळके, प्रशांत मोरे, अरुण जोर्वेकर, विक्रम ससे, दिलीप डांगे, स्वप्नील शिंदे, श्रीमती ज्योती पवार, योगेंद्र पालवे, अर्जुन मंडलिक, श्रीमती मनीषा साळवे, व्यवस्थापक राजेंद्र पवार, उपव्यवस्थापक प्रशांत लोखंडे व सभासद उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post