। अहमदनगर । दि.30 मे 2022 । सामाजिक न्याय विभागाची मिनी ट्रॅक्टर योजना बंद करुन नव्याने टेम्पो योजना सुरु करुन बेरोजगार युवकांना आधार देण्याच्या मागणीचे निवेदन चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना दिले. या योजनेत लाभार्थींची होणारी लुट व खरा लाभार्थी योजनेपासून कसा वंचित राहतो, याबाबत सविस्तर माहिती खामकर यांनी मंत्री मुंडेंना दिली.
सामाजिक न्याय विभाग योजनांच्या माध्यमातून अनुसूचित जाती, नवबौध्द यांच्या कल्याणकारी योजनेतून मिनी ट्रॅक्टर योजना राबविण्यात येत आहे. या योजचेचा लाभ गरजूंना होत नसल्याचे तक्रारीतून पुढे आले आहे. मिनी ट्रॅक्टर योजना मंजूर करताना मोठी आर्थिक लूट लाभार्थ्यांकडून झाल्याच्या सुध्दा तक्रारी आल्या आहेत. खरा लाभार्थी मिनी ट्रॅक्टर योजनेतून वंचित असल्याचे निदर्शनास आले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
आजची परिस्थिती बघता अनेक युवक बेरोजगार आहेत. शिक्षण घेऊन नोकरी नाही, उद्योग व्यवसाय करण्यासाठी आर्थिक व अनेक अडचणी आहेत. त्यामुळे या योजनेसाठी असलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या जाचक अटी शिथील करुन युवकांसाठी टेम्पो योजना राबविल्यास युवकांना दैनंदिन आर्थिक उत्पन्न मिळून त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकणार असल्याचे स्पष्ट करुन, मिनी ट्रॅक्टर योजना बंद करुन नव्याने टेम्पो योजना सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजयजी मुंडे यांच्याशी टेम्पो योजना ही युवकांना आधार देणारी व बेरोजगारी कमी करणारी असल्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. ही योजना लागू करण्यासंदर्भात प्रशासकीय स्तरावर अभ्यास करुन ही योजना अंमलात आणण्यासाठी मंत्री मुंडे यांनी सकारात्मकता दाखविली असल्याची माहिती खामकर यांनी दिली.