खेळाचा निखळ आनंद देणारी सोहम कप क्रेझी क्रिकेट स्पर्धा


अहमदनगर । दि.14 एप्रिल । प्रतिनिधी । नगर जैन ओसवाल पंचायत सभेच्या जैन ओसवाल युवक संघ (जॉइज) च्यावतीने नगरमध्ये सोहम कप क्रेझी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्व.राहुल पितळे यांच्या स्मरणार्थ अहमदनगर क्लब मैदानावर झालेल्या या स्पर्धेत यंदा आयोजकांनी महिला मुलींच्या संघांना प्रवेश देत एक वेगळाच उपक्रम राबविला. मुलीही कोणत्याही खेळात अजिबात मागे नाहीत.

उलट देशाला ऑलिम्पिक पदके मिळवून देण्याची कामगिरी कर्नाम मल्लेश्वरी, पी. व्ही. सिंधू अशा अनेक महिलांनी केली आहे. त्यामुळेच जेव्हा क्रेझी क्रिकेटमध्ये महिलांचेही स्वतंत्र सामने रंगणार हे कळले तेव्हापासूनच आम्ही संघबांधणी सुरु केली व प्रवेश घेतला. ज्या मुली व महिलांनी कधीही प्रत्यक्ष मैदानावर क्रिकेट खेळले नव्हते त्यांनीही या स्पर्धेमुळे हातात बॉल व बॅट घेतली.

स्पर्धेत नोंदणी केल्यापासून सराव सुरु केला. क्रेझी क्रिकेट हा क्रिकेटचा मुळातच गंमतीशीर प्रकार आहे. त्यामुळे आम्हाला सर्वांनाच तो प्रचंड आवडला. प्रत्येक सामना गांभीर्याने खेळतानाच खेळाचा मनमुराद आनंद प्रत्येक खेळाडूने लुटला.

मैदानावर तसेच मैदानाबाहेरही धमालमस्ती करीत आम्ही स्पर्धेत सहभाग घेतला. सर्वच वयोगटातील मुली, महिला यानिमित्त एकत्र आल्या. आम्ही हास्य विनोदाची मैफल रंगवली, मैदानावर मनसोक्त धावलो, एकमेकींच्या सहवासात स्पर्धेचे चार दिवस कधी संपले ते कळलेही नाही. इतर संघांचे सामनेही आम्ही तितक्याच उत्साहात पाहिले, खेळाडूंना प्रोत्साहन दिले.

स्पर्धा काळात आम्ही जी धमाल केली ती अविस्मरणीय आहे. प्रत्येकीला काही तरी नवीन शिकायला मिळाले. संघभावना मनात रुजली. जैन ओसवाल पंचायत सभेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया तसेच सर्व पदाधिकारी आणि आमच्या नमोह 99 टिमचे मेंटॉर अजित बोरा यांनी आम्हाला वेळोवेळी प्रोत्साहन दिले. हारजीतपेक्षाही खेळाचा पुरेपुर आनंद लुटा असेच ते नेहमी सांगत असत.

आमच्या टिममधील प्रत्येकीची त्यांनी खूप काळजी घेतली. स्पर्धेत विजेतेपद मिळाल्याने आमचा आनंद व्दिगुणित झाला. आमच्या टिममधील सोनल गुगळे, नेहा बोरा, तनिष्का गुंदेचा, पूर्ती मुनोत, ईश्वरी बोरा, स्नेहा पोखरणा, प्रसन्ना बोरा, श्रध्दा लुणे, रितिका फिरोदिया, रचना गांधी, निकिता गुगळे या सर्वांच्यावतीने पुन्हा एकदा जॉईजला धन्यवाद व आभार!

Post a Comment

Previous Post Next Post