। मुंबई । दि.25 एप्रिल । भायखळा तुरुंगात असलेल्या खासदार नवनीत राणा यांची प्रकृती बिघडली असून, त्यांना भायखळा कारागृह रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. शासकीय कामांत अडथळा आणल्याचा राणा दाम्पत्यावर ठपका असून, त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेले मातोश्री समोर हनुमान चालीसा वाचणार, अशी घोषणा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी केल्याने शिवसेना विरुद्ध राणा असा सामना रंगला होता.
या प्रकरणात राणा दाम्पत्याला चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी खार पोलिसांकडून शनिवारी अटक करण्यात आली. राणा दाम्पत्याची शनिवारची रात्र जेलमध्येच गेली. त्यांना मुंबईतील बांद्रा महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
याच दरम्यान,नवनीत राणा यांची प्रकृती बिघडली असून कारागृहातील रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. नवनीत राणा यांच्या जिवाला धोका असल्याचे त्यांच्या वकिलांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे, नवनीत राणा यांना इतरत्र रुग्णालयात हलवण्याची शक्यता आहे.
