। अहमदनगर । दि.14 जानेवारी । पोस्ट कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करीत कार्यालयातील लोखंडी तिजोरी व त्यात असलेली रोख रक्कम, पोस्टल स्टॅम्प, रेव्हेन्यू स्टॅम्प चोरुन नेल्याची घटना संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे घडली.
याबाबत पोस्टमास्तर सुमंत प्रभाकर काळे (वय 45, रा.गुंजाळवाडी, ता.संगमनेर) यांनी घारगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी (दि. 11) पहाटे 2 ते 2.30 च्या सुमारास घारगाव येथील पोस्ट ऑफीसच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला.
कार्यालयात ठेवलेली लोखंडी तिजोरी चोरट्यांनी पळवली. या तिजोरीत काही रोख रक्कम होती. याशिवाय कार्यालयातील पोस्टल स्टॅम्प, रेव्हेन्यू स्टॅम्प असा 38 हजार 68 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला आहे. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.