। अहमदनगर । दि.14 जानेवारी । मकर संक्रांतीनिमित्त पतंगाचा आनंद लुटताना चिनी व नायलाॅन मांजाच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. तथापि, शहरात चाेरट्या पद्धतीने चिनी मांजाचा वापर होत असल्याने पक्षी जखमी होत आहेत. दरवर्षी या मांजामुळे नागरिक जखमी होण्याच्याही घटना घडतात. यापार्श्वभूमीवर शिक्षक डाॅ. अमोल बागुल यांनी लाईफ राॅड व काॅलर जॅकेट बनवला आहे.
नायलाॅन मांजा व चिनी मांजामुळे दुचाकीस्वारांना अनेकदा अपघात होऊन मानेला गंभीर दुखापत होते. तसेच अनेकदा चोरटेही आडव्या तारा बांधून रस्ता लूट करतात. यापासून संरक्षण व्हावे या उद्देशाने डाॅ. बागूल यांनी हे संशोधन केले आहे. दुचाकीच्या हँडलला लावण्यासाठी लाईफ राॅड व दुचाकीस्वाराच्या गळ्याला लावण्यासाठी काॅलर जॅकेट तयार केले.
या संकल्पनांचा पेटंट, ट्रेडमार्क, काॅपीराईट तसेच आयएसओ प्रमाणिकरण व अधिकार जगभरातील दुचाकी कंपन्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून मोफत देणार असल्याचे डाॅ. बागूल यांनी जाहीर केले. तसेच संशोधनाच्या संकल्पनेनुसार उद्योजक निलेश पठारे, सुनील मोरे, जिम्मी वधवा यांनी वस्तु संशोधन निर्मितीबाबत मार्गदर्शन केले.
असे आहे काॅलर जॅकेट
काॅलर जॅकेटमध्ये प्लास्टिकसदृष्य पण मजबुत साहित्य व हिटलाॅनचा वापर केला आहे. मांजामुळे गळ्याला होऊ शकणारी इजा टाळता येणार आहे. या जॅकेटचे वजन ७० ग्रॅम असून त्यासाठी ३० रुपये खर्च येतो.
असा असेल राॅड
२०० ग्रॅम वजनाचा लाईफ राॅड दीड ते दोन फुटांचा धातुचा पोकळ पाईप आहे. त्यावर रेडियम लावले आहे. मांजा अथवा तार आपल्याला इजा करण्यापूर्वीच या राॅडवरील खाचांमुळे तुटेल. डाव्या बाजुच्या आरशाजवळ हा राॅड बसवता येतो.